रत्नागिरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल १२८ कोटी ५४ लाख रुपयांचा विक्रमी महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १०० टक्क्यांहून अधिक महसूल वसुली करण्यात कार्यालयाला यश आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली.
मागील वर्षीच्या १०५ कोटी ५० लाखांच्या महसुलाच्या तुलनेत यंदा लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून, ही कामगिरी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयपूर्ण आणि मेहनती प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले जात आहे. या यशामुळे कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाहन नोंदणीतून मोठा वाटा
प्राप्त महसूलामध्ये सर्वाधिक हिस्सा वाहन नोंदणीमधून मिळाला आहे. वर्षभरात एकूण ३४,५४० वाहनांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये दुचाकी २५,९०८, चारचाकी ४,७६१, ऑटोरिक्षा १,४६१, मालवाहू वाहने २,०५५ तसेच प्रवासी वाहने १०७ व इतर वाहने यांचा समावेश आहे
आकर्षक नंबर प्लेट्समधूनही कोटींची कमाई झाली आहे. या आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी वाहनधारकांचा वाढता कल दिसून आला. ३,५२९ वाहनधारकांकडून ३ कोटी ९४ लाख रुपयांचा महसूल या माध्यमातून प्राप्त झाला.
अंमलबजावणी पथकाची कडक कारवाई
कार्यालयाच्या अंमलबजावणी पथकाने वर्षभरात ५,८१४ दोषी वाहनांवर कारवाई करत ३ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे नियमांचे पालन करण्याबाबतही सकारात्मक संदेश गेला आहे.
परिवहन विभाग हा शासनाच्या महसूलात मोठा वाटा उचलणारा महत्त्वाचा विभाग ठरत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही भरीव योगदान देण्यात आले आहे. पुढील वर्षीही याच जोमाने कामगिरी करण्याचा कार्यालयाचा निर्धार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एकूणच, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरीने गाठलेला हा महसूलाचा उच्चांक केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून, तो कार्यक्षमता, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.
