रत्नागिरी : जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान हिंदू देवदेवतांचा अवमान, भारतीय सैनिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये आणि देशविरोधी घोषणा झाल्याचा आरोप करत संविधान सन्मान मंचाच्या वतीने बुधवारी रत्नागिरीत भव्य ‘राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा’ काढण्यात आली. राष्ट्रहित, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेत युवक-युवतींसह नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मात्र या मोर्चात सत्तेत असलेल्या महायुतीतील लोकांचा मोठा भरणा असल्याने हा मोर्चा सत्ताधारी पक्षाचा असल्याची चर्चा रत्नागिरी शहरात रंगू लागली आहे.

मारुती मंदिर येथून सकाळी साडेदहाच्या सुमारास पदयात्रेला प्रारंभ झाला. हातात राष्ट्रप्रेम, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन युवक, युवती आणि विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध आणि शांततेत काढलेल्या या मूक पदयात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी अजिंक्य केसरकर यांनी सांगितले की, “नीट परीक्षेच्या मुद्द्याचे निमित्त करून देशात अराजकता निर्माण करण्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.”पदयात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विद्यार्थी प्रतिनिधी आणि नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर झालेल्या सभेत विद्यार्थी प्रतिनिधींनी जंतर-मंतरवरील आंदोलन कसे भरकटले आणि त्यात राष्ट्रविरोधी शक्तींनी कथितरीत्या कशी घुसखोरी केली, याविषयी आपली भूमिका मांडली. “जेन-झी पिढी राष्ट्राच्या सुरक्षेबाबत सजग असून संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पदयात्रेतून शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. राष्ट्रहित, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले, “रत्नागिरीतील या मूक पदयात्रेतून नागरिकांनी संविधान आणि राष्ट्राप्रती असलेली निष्ठा अधोरेखित केली आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा कार्यक्रम नसून सर्वधर्मसमभाव, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा उपक्रम आहे. विविध धर्म, समाज आणि राजकीय विचारांचे नागरिक एकत्र येत संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार या पदयात्रेतून व्यक्त झाला. रत्नागिरीतून दिलेला हा संदेश राज्यासह देशभर पोहोचेल, असा विश्वास आहे.”