रत्नागिरी : परीक्षांचा कालावधी संपताच कोकणातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून, सुट्यांची चाहूल लागताच रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणे पुन्हा गजबजू लागली आहेत. मात्र विकेंड संपल्यानंतर मुंबईकडे परतणाऱ्या वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे संगमेश्वर शहरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

सुमारे ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना तासनतास अडकून राहावे लागले. संगमेश्वर एसटी स्थानक परिसर, देवरुख मार्ग तसेच सोनवी पुलापासून शास्त्री पुलापर्यंत सर्वच रस्त्यांवर वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. उकाडा, वाहनांचा धूर आणि प्रचंड गर्दी यामुळे प्रवासी अक्षरशः हैराण झाले.

सुरुवातीच्या काळात चौकात पोलीस यंत्रणा अनुपस्थित असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. त्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर कोंडी फोडण्यात यश मिळवले. दरम्यान, महामार्गावरील रखडलेली कामे ही या कोंडीमागील प्रमुख कारणे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

कोळंबे, कुरधुंडा आणि माभळे परिसरातील अपूर्ण कामे, रस्त्यांवरील खड्डे तसेच एकेरी मार्गावर सुरू असलेली दुहेरी वाहतूक यामुळे वाहनांचा वेग मंदावला. अरुंद सोनवी पुलावर एकाच वेळी अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक टाळण्यासाठी काही वाहनचालकांनी शहरातील अंतर्गत रस्त्यांचा पर्याय निवडल्याने बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज वाहन चालक व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.