रत्नागिरी : दुबई येथे निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील काही नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे हे पत्नी सौ. ज्योती सप्रे यांच्यासह दुबई येथे गेले असताना अचानक परिस्थिती बदलल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
इस्त्रायल–इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढल्यानंतर काही काळ हवाई वाहतूक विस्कळीत झाली. उड्डाणे रद्द झाल्याने अनेक प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागले. देवरुख येथील सुरेश सप्रे दुबईत असल्याची बातमी पसरताच त्यांच्या संपर्कासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते; मात्र संपर्क होऊ शकला नव्हता.
काल उशिरा रात्री त्यांनी ‘व्हॉट्सअॅप’ संदेशाद्वारे आपण सुरक्षित असल्याचे कळवले. सौ. ज्योती सप्रे यांनीही संदेश पाठवून, “आम्ही सध्या एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहोत. पुढील सूचना मिळेपर्यंत हॉटेलमध्येच थांबण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ,” असे सांगितले.
दरम्यान, साखरपा येथील शिवसेना नेते बापू शेट्ये हे पत्नी सोनम शेट्ये व अन्य चार जणांसह दुबईत अडकले आहेत. त्यांचे विमान उड्डाणासाठी सज्ज असतानाच सर्व उड्डाणे रद्द झाल्याने त्यांना प्रवास करता आला नाही. ते सर्वजण सध्या सुरक्षित ठिकाणी असल्याचे कळते. तसेच सप्रे दाम्पत्यासह भाजपा नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, जितेंद्र निमकर कुटुंबीय आदी मिळून संगमेश्वर तालुक्यातील एकूण १३ जण दुबईत आहेत. याशिवाय चिपळूण येथील सनी जागुष्टे व अन्य एक जण असे दोघेही तेथेच अडकले आहेत.
“सर्वजण सुखरूप असून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. नातेवाईकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन सनी जागुष्टे यांनी दूरध्वनीवरून केले.
परिस्थिती सामान्य होताच परतीच्या प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.
