रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार ७१२ शाळांपैकी तब्बल ४०० शाळांकडे स्वतंत्र स्वयंपाकघर (किचन शेड) उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या केवळ २ हजार ३१२ शाळांमध्ये किचन शेडची सुविधा आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये पोषण आहार उघड्यावर अथवा जुन्या, पडक्या खोल्यांमध्ये शिजवला जात असल्याचे चित्र आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील शेकडो शाळांमध्ये स्वयंपाकघराचीच सुविधा नसल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दररोज आवश्यक प्रथिने मिळावीत यासाठी १०० ग्रॅम तांदूळ व पूरक पदार्थ, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ व पूरक धान्य दिले जाते. मात्र, अनेक शाळांमध्ये धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने तसेच स्वयंपाकासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याने अन्नाच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत आहे.

तालुकानिहाय स्थिती पाहता खेड तालुक्यात सर्वाधिक १०० शाळांकडे किचन शेड नाही. त्यापाठोपाठ लांजा तालुक्यात ७०, गुहागरमध्ये ५९ आणि चिपळूणमध्ये ४५ शाळांना स्वतंत्र स्वयंपाकघराची सुविधा उपलब्ध नाही. नगर परिषद क्षेत्रातील ३३ शाळांपैकी २५ शाळांमध्येही किचन शेड नसल्याची नोंद आहे.

नवीन स्वयंपाकघर उभारण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर केवळ मागणीपुरते न थांबता निधी मंजूर करून स्वयंपाकघरची कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. अन्न व औषध प्रशासनाने शिक्षण विभागाच्या समन्वयाने शाळांमधील पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि स्वयंपाकाची ठिकाणे यांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे.

तालुकानिहाय स्वयंपाकघरची स्थिती

तालुकाएकूण शाळास्वयंपाकघर नसलेल्या शाळा
मंडणगड१५८२५
दापोली२९८
खेड३५०१००
चिपळूण३७०४५
गुहागर२०९५९
संगमेश्वर३५४२३
रत्नागिरी३४१३०
लांजा२२५७०
राजापूर३६६१६
नगर परिषद३३२५
एकूण२७१२४००

खेड, लांजा, गुहागरमध्ये स्थिती गंभीर

खेडमध्ये १००, लांजामध्ये ७० आणि गुहागरमध्ये ५९ शाळांना किचन शेडचा अभाव आहे. जिल्ह्यातील एकूण ४०० शाळांमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर नसल्याने पोषण आहार शिजविण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ जागा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची तातडीची जबाबदारी ठरत आहे.