रत्नागिरी : कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा म्हणजे ग्राहकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय. साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या आंब्याच्या नियमित हंगामाला अद्याप अवकाश असतानाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हापूस आंब्याने ऑक्टोबर महिन्यातच बाजारपेठेत हजेरी लावली आहे. प्रतिकूल हवामानावर मात करत दोन्ही जिल्ह्यांतील बागायतदारांनी आंब्याचे उत्पादन घेतल्याने २०२७ च्या हंगामापूर्वीच कोकणच्या हापूसचा गोडवा बाजारात दरवळू लागला आहे. रत्नागिरीच्या पहिल्या चार डझनांच्या पेटीला तब्बल २१ हजार रुपये, तर डझनाला सहा हजार रुपये दर मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथील वडिलोपार्जित आंबा बागायतदार दत्ताराम पड्यार यांच्या बागेतील हापूस आंब्याची चार डझनांची पहिली पेटी रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत दाखल झाली. गोखले नाका येथील सुमारे ५५ वर्षांची परंपरा असलेल्या पोवार बंधू आंबेवाले यांच्याकडे ही पेटी विक्रीसाठी आली. या पेटीला २१ हजार रुपये, तर डझनाला सहा हजार रुपये दर मिळाल्याने आंबा व्यावसायिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नियमित हंगामापूर्वीच रत्नागिरी हापूसची पेटी बाजारात दाखल झाल्याने २०२७ च्या हंगामाचा आगळावेगळा मुहूर्त साधला गेला आहे.

दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरये रामेश्वर येथील प्रगतशील आंबा बागायतदार नीलेश बानकर यांनीही ऑक्टोबर महिन्यातील संकष्टीच्या मुहूर्तावर हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी बाजारपेठेकडे रवाना केली आहे. दिवाळीच्या काळात आणखी सहा ते सात पेट्या वाशी मार्केटमध्ये पाठवण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यामुळे रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्गच्या हापूसनेही हंगामापूर्वीच बाजारपेठेत प्रवेश केला आहे.

सिंधुदुर्ग – गिरये रामेश्वर आंबा बागायतदार नीलेश बानकर .

यंदा आंब्याचा मोहर एप्रिल-जूनदरम्यानच झाडांवर आला होता. मात्र, प्रतिकूल वातावरणामुळे हा मोहर टिकवून ठेवणे बागायतदारांसाठी मोठे आव्हान होते. मोहराचे संरक्षण करण्यासाठी झाडांवर छप्पर उभारण्यापासून वारंवार औषध फवारणी करण्यापर्यंत विशेष मेहनत घ्यावी लागली. या कष्टांचे फळ म्हणून ऑक्टोबर महिन्यातच आंब्याची पहिली पेटी बाजारात पाठवणे शक्य झाल्याचे बानकर यांनी सांगितले.

गेल्या वर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पहिली आंबापेटी बाजारात पाठवली होती. यंदाही हंगामातील पहिली पेटी बाजारात पाठवण्याचा मान आपल्याला मिळाला असल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया बानकर यांनी दिली.

प्रतिकूल हवामान, बदलते निसर्गचक्र आणि उत्पादनातील आव्हाने यांवर मात करत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बागायतदारांनी ऑक्टोबरमध्येच हापूस बाजारात आणला आहे. नियमित हंगाम सुरू होण्यापूर्वीच कोकणच्या हापूसला मिळालेला हा प्रतिसाद आंबा उत्पादकांसाठी उत्साहवर्धक ठरत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आणखी पेट्या बाजारात दाखल होणार असल्याने आंबाप्रेमींचे लक्ष आता कोकणच्या या लवकर आलेल्या हापूसकडे लागले आहे.