रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील झोपडपट्टीधारकांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणारा ग्रीन पुनर्वसन प्रकल्प साकार होत असून, साडेतीन एकर जागेत तब्बल ७३५ कुटुंबांना मोफत सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक घराची अंदाजे किंमत सुमारे १६ लाख रुपये असून, या योजनेमुळे हजारो नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्याधिकारी गारवे यांनी सादरीकरणातून शहरातील झोपडपट्ट्यांची सद्यस्थिती आणि प्रस्तावित पुनर्वसन आराखडा मांडला. सध्या ७३५ झोपड्यांमध्ये ३३८३ नागरिक वास्तव्यास असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी ११ इमारती उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला सुमारे ३८६ चौ.फुटाची सुसज्ज सदनिका, वाहनतळासह इतर मूलभूत सुविधा देण्यात येतील.

पालकमंत्री सामंत यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ झोपडपट्टीधारकांना मिळवून देण्यासाठी कामगार नोंदणीही केली जाणार आहे. या ग्रीन प्रकल्पामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना शहरात सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात राहण्याची संधी मिळणार आहे. हा प्रकल्प केवळ घर देण्यापुरता मर्यादित नसून, हजारो नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे.

याच बैठकीत शहरातील वाढत्या प्लास्टिक कचऱ्याबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करून पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.