रत्नागिरी :  विद्यार्थ्यांचे सुरक्षित बालपण, सजग नागरिकत्व आणि सक्षम भविष्य घडविण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलिसांनी राबविलेले ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ अभियान जिल्ह्यातील पोलिसिंगची संवेदनशील आणि नागरिकाभिमुख दिशा अधोरेखित करणारे ठरले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३ हजार शाळांना प्रत्यक्ष भेट देत तब्बल २ लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘सुरक्षित बालपण, सजग विद्यार्थी, सक्षम भविष्य’ हे ब्रीदवाक्य घेऊन राबविण्यात आलेल्या या अभियानात पोलिसांनी पारंपरिक चौकटीबाहेर जात विद्यार्थ्यांशी ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ या स्नेहपूर्ण भूमिकेतून संवाद साधला. त्यामुळे पोलिसांविषयीची भीती कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण करण्यास मदत झाली.

बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध, ‘गुड टच-बॅड टच’, मुलींची सुरक्षितता, पोक्सो कायद्यातील तरतुदी, तसेच अडचणीच्या प्रसंगी पोलिसांशी संपर्क कसा साधावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक, विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात निर्माण झालेला हा संवादाचा पूल भविष्यात सुरक्षित समाजनिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नितीन बगाटे यांनी रत्नागिरी पोलीस दलाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि आधुनिक पोलिसिंगला प्राधान्य दिले आहे. गुन्ह्यांचा तपास, विश्लेषण आणि न्यायालयीन निकालांचे मूल्यमापन अधिक परिणामकारक करण्यासाठी ‘राईड’ अॅपचा वापर केला जात आहे. दोषसिद्धी तसेच निर्दोष सुटका झालेल्या प्रकरणांची अचूक माहिती आणि समरी तयार करण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी ‘मिशन रॅपिड’ या विशेष अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसिंग अधिक गतिमान, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख करण्याचा हा प्रयत्न ठरत आहे.

नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ‘मिशन प्रतिसाद’, ज्येष्ठ नागरिकांच्या काळजी व सुरक्षेसाठी ‘मिशन जीवन’, तर सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्नांच्या निराकरणासाठी ‘मिशन प्रगती’, ‘मिशन परिपूर्ती’, ‘मिशन पोलीस पाटील’, ‘मिशन सायबर जागृती’, ‘मिशन ग्राम सुरक्षा’, ‘मिशन नवी दिशा’, ‘मिशन आरोग्य’ आणि ‘मिशन जागरूक नागरिक’ यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपर्यंत, नागरिकांच्या तातडीच्या मदतीपासून सायबर जनजागृतीपर्यंत आणि तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगपासून सामाजिक प्रश्नांच्या निराकरणापर्यंत रत्नागिरी पोलीस दलाने विविध आघाड्यांवर आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

नितीन बगाटे यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. देशातील १०० सर्वोत्कृष्ट पोलीस प्रमुखांच्या यादीत महाराष्ट्रातील कृषिकेश रावले, नीतीपुडी रश्मिता राव, सोमय मुंडे आणि नितीन दत्तात्रय बगाटे या चार अधिकाऱ्यांचा समावेश झाला आहे.गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, नागरिककेंद्री पोलिसिंग, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संकटाच्या काळातील नेतृत्व अशा विविध निकषांवर झालेल्या मूल्यांकनात महाराष्ट्राच्या पोलीस नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

या यादीत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा समावेश विशेष लक्षवेधी ठरला आहे. कोकणातील भौगोलिक व प्रशासकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांशी थेट संवाद, तंत्रज्ञानाधारित पोलिसिंग आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना दिलेले प्रोत्साहन यामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली आहे.

रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांचे नाव देशातील निवडक १०० पोलीस प्रमुखांच्या यादीत झळकणे हा केवळ एका अधिकाऱ्याचा सन्मान नसून रत्नागिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेलाही मिळालेली राष्ट्रीय पावती आहे. सुरक्षितता, संवेदनशीलता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांच्या मनातील विश्वास अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकले आहे.