रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावर वाहून येणारे आणि अनेकदा कचरा म्हणून बाजूला सारले जाणारे समुद्री शेवाळ आता शेतीसाठी उपयुक्त जैविक खत ठरणार आहे. निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या या साधनसंपत्तीचा शास्त्रीय वापर करण्याचा संकल्प गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथील वनस्पतीशास्त्र विभागाने हाती घेतला आहे.

डिसेंबर ते मार्च हा कालावधी समुद्री शेवाळांच्या वाढीसाठी पोषक मानला जातो. या काळात समुद्राच्या लाटांबरोबर मोठ्या प्रमाणात शेवाळ किनाऱ्यावर साचते. मात्र, त्याकडे बहुतेक वेळा कचऱ्याच्या नजरेने पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘सामुदायिक सहभाग कार्यक्रमां’तर्गत भाट्ये समुद्रकिनारा येथे जाऊन शेवाळ संकलनाची मोहीम राबवली.

या मोहिमेत प्रामुख्याने तपकिरी रंगाचे शेवाळ मोठ्या प्रमाणात आढळले. समुद्री शेवाळ तज्ज्ञ डॉ. विराज चाबके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या समुद्री अवशेषांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण नैसर्गिकरीत्या अधिक असते. त्यामुळे रासायनिक खतांना हा प्रभावी आणि स्वस्त जैविक पर्याय ठरू शकतो.

केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे शेवाळ संकलित केले आहे. येत्या काही दिवसांत या संकलित शेवाळावर प्रक्रिया करून जैविक खत निर्मिती केली जाणार आहे. या प्रयोगामुळे स्थानिक शेतीला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उपक्रमासाठी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

 वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, तर प्रा. परेश गुरव यांनी विद्यार्थ्यांसमवेत प्रत्यक्ष संकलनात पुढाकार घेतला. समुद्रकिनाऱ्यावरील ‘कचरा’ ठरणारे शेवाळ आता पर्यावरणपूरक शेतीसाठी उपयुक्त साधन ठरणार असल्याने या उपक्रमाकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.