रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांची हजाराहून अधिक पदे रिक्त असताना झालेल्या भरती प्रक्रियेत प्रत्यक्षात केवळ ४५८ शिक्षकांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक व्यवस्थेतील रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १,०२७ रिक्त पदांपैकी ४७८ पदांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, त्यापैकी २० उमेदवार रुजू न झाल्याने प्रत्यक्ष नियुक्तीचा आकडा ४५८ वरच थांबला. त्यामुळे तब्बल ५६९ पदे अद्याप रिक्त राहिली आहेत. विशेष म्हणजे या भरतीत रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांच्या वाट्याला अवघ्या ७० जागा आल्याने डीएड, बीएड पात्र बेरोजगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सध्या १,५०० हून अधिक डीएड, बीएड पात्र उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. एका बाजूला पात्र उमेदवारांची मोठी संख्या आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांची शेकडो पदे रिक्त, अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध रिक्त पदांच्या निम्म्यापेक्षाही कमी पदे भरली जात असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम राहण्याची शक्यता आहे.

रिक्त पदांचा प्रश्न कायम

शिक्षक भरतीतील रिक्त पदांचा प्रश्न रत्नागिरीसाठी नवा नाही. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात ८०० हून अधिक पदे रिक्त असतानाही केवळ २४६ पदांची भरती करण्यात आली होती. उर्वरित पदे पुढील टप्प्यात भरण्यात येतील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, हा पुढील टप्पा अद्याप अपेक्षित प्रमाणात झालेला नसल्याने रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे. परिणामी काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता तीव्र झाली असून, एकशिक्षकी शाळांपुढे मनुष्यबळाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांची संख्या, शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षकांवरील वाढता कामाचा ताण या सर्वांचा परिणाम शालेय व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

स्थानिक उमेदवारांच्या पदरी पुन्हा निराशा ?

मागील भरतीप्रमाणे यंदाही स्थानिक उमेदवारांना तुलनेने कमी संधी मिळाल्याचे चित्र आहे. मागील भरतीत कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे आदी जिल्ह्यांतील उमेदवार मोठ्या संख्येने निवडले गेले होते, तर रत्नागिरीतील केवळ ४८ उमेदवारांना संधी मिळाली होती. यंदाही स्थानिक उमेदवारांची संख्या ७० वरच राहिल्याने जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मागील भरतीत नियुक्त झालेले काही शिक्षक सध्याच्या भरती प्रक्रियेचा लाभ घेत आपल्या मूळ जिल्ह्यात परतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील रिक्त पदांचा प्रश्न भविष्यात आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रहिवासी दाखल्यांवरूनही प्रश्नचिन्ह

स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या रहिवासी निकषांच्या संदर्भात मागील भरतीदरम्यान १५ वर्षांच्या वास्तव्याचे कथित बनावट दाखले सादर केल्याचे प्रकार समोर आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली होती. मात्र, चौकशीचा अंतिम अहवाल काय आला आणि संबंधितांवर कोणती कारवाई झाली, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

५६९ पदे भरण्याची मागणी

४७८ पदांसाठी निवड प्रक्रिया राबवूनही प्रत्यक्षात ४५८ शिक्षक रुजू झाले. परिणामी १,०२७ रिक्त पदांपैकी ५६९ पदे अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे, स्थानिक पात्र उमेदवारांना मिळणाऱ्या मर्यादित संधी आणि रखडलेला पुढील भरती टप्पा या तिन्ही बाबींकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे टप्प्याटप्प्याने न भरता शाळांची प्रत्यक्ष गरज आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, तसेच स्थानिक पात्र डीएड, बीएड उमेदवारांना न्याय्य संधी द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

पवित्र पोर्टल द्वारे उमेदवारांची भरती होत आहे. त्यामुळे शासन स्तरावरुन उमेदवार निवडले जात आहे. स्थानिक उमेदवारांची संख्या या भरतीत कमी आहे. यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त स्थानिक उमेदवारांनी देखली या भरती प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. – नंदकुमार मुरकर, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद रत्नागिरी.