रत्नागिरी – नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी कोकणाकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेतल्याने रत्नागिरी जिल्हा सध्या अक्षरशः ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक तसेच पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांमुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले असून पर्यटन व्यवसायाला चांगलीच चालना मिळाली आहे.

जिल्ह्यातील गणपतीपुळे, रत्नागिरी, कर्दे, गुहागर, मुरुड या लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. निळाशार समुद्र, स्वच्छ किनारे आणि कोकणी पाहुणचाराचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत. गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी तसेच समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

या वाढत्या गर्दीचा थेट परिणाम निवास व्यवस्थेवर झाला असून जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, लॉज आणि होमस्टे जवळपास पूर्णपणे भरले आहेत. अनेक ठिकाणी आगाऊ बुकिंगशिवाय खोली मिळणे अवघड झाले आहे. स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित सेवा पुरवठादारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, पर्यटकांच्या वाढलेल्या वाहतुकीमुळे मुंबई–गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः संगमेश्वर बाजारपेठ परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे. सुट्टीचा काळ आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या या गर्दीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.