रत्नागिरी : टीडब्लूजे आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी संकेश घाग याला अटक झाल्यानंतर उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. हजारो गुंतवणूकदारांना आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी हॉटेलमध्ये नेऊन जेवण दिल्याचे समोर आले आहे.

संकेश घाग हा टीडब्लूजे कंपनीचा संचालक असून, हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या घागला चिपळूण पोलिसांनी पुण्यातून अटक केली. २७ जानेवारी रोजी त्याला चिपळूण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मात्र, अटकेनंतर आरोपीला न्यायालयात नेण्याआधीच हॉटेलमध्ये जेवण दिल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य आरोपींना कठोर वागणूक मिळते, तर हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीला ‘व्हीआयपी’ सुविधा का? असा सवाल संतप्त गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी संबंधित पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. “दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

हजारो गुंतवणूकदार न्यायासाठी धडपडत असताना आरोपीला मिळालेली कथित ‘सुविधा’ ही केवळ प्रशासकीय चूक आहे की, यंत्रणेमधील गंभीर त्रुटी? याचे उत्तर येणारे दिवसच देतील. मात्र, या प्रकरणाने कायदा सर्वांसाठी समान आहे का, हा मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.