रत्नागिरी: ऐन एप्रिल महिन्यात वाढत्या उन्हाची अपेक्षा असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. सलग दोन ते तीन दिवस जिल्ह्याच्या भागात दाट काळे ढग दाटून आले असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने वातावरण ढगाळ आणि दमट बनले आहे. अशा परिस्थितीमुळे बागायतदारांवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
हवामान विभागाकडून वारंवार आता कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली जावू लागली आहे. आठवडाभरापूर्वीच गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसातून सावरत असताना पुन्हा अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका हापूस आंबा उत्पादनाला बसत आहे.
ढगाळ वातावरण आणि वाढलेली दमटता यामुळे ‘तुडतुड्या’ व ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच पावसामुळे आंबा गळून पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.यंदा आधीच सुमारे ८० टक्के आंबा उत्पादनाचे नुकसान झाले असून उरलेल्या पिकावरही संकटाचे ढग दाटले आहेत. परिणामी बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सतत बदलणाऱ्या हवामानामुळे उष्णता आणि दमटता वाढली असून नागरिकही उकाड्याने त्रस्त झाले आहेत. ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे पुढील काही दिवस हवामान अधिक अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोट..
काही दिवसांपासून पावसाळी वातावरण असल्याने आंबा व काजू पिकाचे मोठे नुकसान होत आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम निसर्ग करत आहे. सतत पडणा-या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आम्ही बागायतदार संकटात आहोत..
- संतोष मयेकर, आंबा बागायतदार, रत्नागिरी</li>
