रत्नागिरी : वारकरी संप्रदाय, संतपरंपरा आणि भगवान श्री विठ्ठल यांच्या संदर्भात अवमानकारक व विकृत चित्रण करणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकावर तात्काळ बंदी घालावी, तसेच ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ मधून ते बाद करावे, अशी मागणी लांजा तालुका वारकरी संप्रदायाने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांना निवेदन सादर करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात वीर शैव समाज निर्मित, अमोल रेडीज लिखित व दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर करण्यात आले होते. अमोल रंगायत्रीतर्फे सादर झालेल्या या नाटकाचा प्रयोग लांजा व रत्नागिरी येथील ३० हून अधिक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ प्रेक्षकांनी पाहिला.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून वारकरी संप्रदाय अहिंसा, भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आदी संतांनी विठ्ठल भक्तीचे मर्म समाजाला दिले. विठ्ठल भक्तीमुळे व्यसनमुक्ती, सन्मार्गाची वाट आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन झाल्याचे अनुभव अनेक वारकरी सांगतात.
मात्र संबंधित नाटकात पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग असलेले वारकरी दांपत्य दहा निष्पाप व्यक्तींची हत्या करत असल्याचे चित्रण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे कथानक अविश्वसनीय असून वारकरी संप्रदायाचा व विठ्ठल भक्तांचा अवमान करणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’, ‘नामा’ अशी संतपरंपरेशी निगडित नावे देण्यात आल्याने संतांचा अवमान झाल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
लोभामुळे माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा आशय व्यक्त करताना नाटकाला ‘ईठ्ठला’ हे नाव देऊन श्री विठ्ठलाची विटंबना करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या नाटकामुळे विठ्ठल भक्तीविषयी गैरसमज, संशय आणि साशंकता निर्माण होऊ शकते, असे वारकरी प्रतिनिधींनी म्हटले आहे. त्यामुळे या नाटकाच्या पुढील सर्व प्रयोगांवर तात्काळ बंदी घालावी, स्पर्धेत कोणताही क्रमांक किंवा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊ नये आणि संबंधित निर्माते, लेखक, दिग्दर्शक व सादरकर्त्यांना पुढील प्रयोग न करण्याची सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी ह.भ.प. मनोहर रणदिवे, तुळशिराम मोरे, विष्णू लांजेकर, दर्शन आग्रे, गोविंद चव्हाण, पांडूरंग शिंदे, मनोहर करंबेळे, किशोर लांजेकर, भिकाजी लांजेकर यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
