रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी नियुक्त केलेल्या रोल मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. खेड तहसीलदार कार्यालय आणि खेड पंचायत समितीला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मतदार यादी पुनरीक्षण मोहीम तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली.

मतदार यादी पुनरीक्षण आणि डिजिटल कामगिरीत रत्नागिरी जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, महाराष्ट्रातील १०० टक्के डिजिटलायझेशन पूर्ण करणारा पहिला जिल्हा ठरल्याचे रुबल अगरवाल यांनी सांगितले. प्रशासनाने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या असून, हरकती आणि सूचना नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात गैरहजर, स्थलांतरित किंवा मयत मतदारांचा समावेश असलेल्या एएसडी मतदारांचे प्रमाण केवळ ९.९ टक्के असून, अशा सुमारे १ लाख ३१ हजार ६१० मतदारांची पडताळणी केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रारूप मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा स्थानिक कार्यालयात जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन अगरवाल यांनी केले.

मतदार यादीत नाव नसल्यास नवीन नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक ६, तर नाव अथवा तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म क्रमांक ८ भरता येणार आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सुविधांसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्री, संबंधित मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन गणेशभक्तांना प्रवासादरम्यान तसेच उत्सव काळात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. भाविकांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.