रत्नागिरी :आगामी काळात जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात. पाणीटंचाई निवारणाच्या कामात कुचराई अथवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे सक्त निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच ९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व भागांचे पाणीटंचाई कृती आराखडे सादर झालेच पाहिजेत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
पंचायत समिती रत्नागिरीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या लोकनेते कै. शामराव पेजे सभागृहात आयोजित पाणीटंचाई कृती आराखडा सभेत सामंत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, सर्व सभापती, जिल्हा परिषद सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून भविष्यात पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता पाण्याचे स्रोत निर्माण करणे, उपलब्ध पाण्याचे संवर्धन करणे आणि भविष्यातील गरजांचा विचार करून दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
“पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे. राजकीय मतभेद आणि आंदोलने बाजूला ठेवून जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
एकाच दिवशी १० हजार वनराई बंधारे
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्ह्यात एकाच वेळी १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
५० विहिरींना प्रत्येकी १२ लाख
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात ५० नव्या विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विहिरीसाठी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर पाण्याचे अतिरिक्त स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
समुद्राचे पाणी गोड करण्याचा दीर्घकालीन पर्याय
रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्याचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोड करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरही चर्चा करण्यात आली. पुढील १०० वर्षांचा पाणीप्रश्न लक्षात घेऊन या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी एमआयडीसीमार्फत लवकरच जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
१५ व्या वित्त आयोगाचा निधी पाण्यासाठी वापरा.
ग्रामपंचायतींनी इतर विकासकामांपेक्षा पाणीटंचाई निवारणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश सामंत यांनी दिले. १५ व्या वित्त आयोगाचा निधी नळपाणी योजनांची दुरुस्ती, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करणे, विहिरींमधील गाळ काढणे तसेच आवश्यकतेनुसार पाणी साठवणुकीसाठी बॅरल्सची व्यवस्था करण्यासाठी वापरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देशही देण्यात आले. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, असे आवाहनही सामंत यांनी केले.
