रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या रिक्त सभापतिपदांच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला असून, पाच महत्त्वाच्या पदांसाठी नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे, सर्व नियुक्त्या सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वीच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून, २५ मार्च रोजी या पदांसाठी औपचारिक निवडणूक पार पडणार आहे. विषय समित्या या जिल्हा परिषदेच्या कामकाजातील महत्त्वाचा घटक मानल्या जातात. धोरणात्मक निर्णय, विविध योजनांची अंमलबजावणी आणि विभागनिहाय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात सभापतींची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, विलास चाळके  उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य विभाग), मयुरी मिलिंद शिर्के  सभापती (महिला व बालकल्याण विभाग), महेश राघू नाटेकर  सभापती (कृषी व पशुसंवर्धन विभाग), अॅड. सुयोग नंदकुमार कांबळे  सभापती (समाजकल्याण विभाग) व नंदकुमार नारायण मुरकर : सभापती (अर्थ व शिक्षण विभाग) यांची सभापती पदी निवड जाहिर करण्यात आल्या आहेत.

पक्षांतर्गत समतोल राखत सर्वांना कामाची संधी मिळावी, या उद्देशानेच सव्वा वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही नामनिर्देशने करण्यात आली आहेत.

दरम्यान, या निवडीचे प्रशासकीय वर्तुळातून स्वागत होत असून, २५ मार्चच्या औपचारिक प्रक्रियेनंतर नव्या सभापतींकडून कार्यभार स्वीकारला जाणार आहे. आगामी निवडणुका आणि ग्रामीण भागातील विकासकामांच्या पार्श्वभूमीवर या नव्या टीमकडून वेगवान कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.