रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्य निवडीवरून रंगत जाण्याची चिन्हे दिसत असतानाच अखेर सत्ताधारी आणि विरोधकांतील चर्चेतून बिनविरोध तोडगा निघाला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर विरोधी सदस्यांनी अर्ज मागे घेतल्याने संभाव्य निवडणूक टळली आणि सर्व समित्यांची निवड बिनविरोध झाली.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत ५६ पैकी ५० सदस्य महायुतीचे असल्याने सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व स्पष्ट आहे. स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याशिवाय जलव्यवस्थापन (६), वित्त (८), शिक्षण (८), बांधकाम (८), आरोग्य (८), कृषी (१०), समाजकल्याण (८), महिला व बालकल्याण (८) आणि पशुसंवर्धन (८) अशा विविध समित्यांसाठी सदस्य निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
या प्रक्रियेदरम्यान विरोधी सदस्यांनी काही समित्यांसाठी अर्ज दाखल केल्याने निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चर्चेअंती विरोधकांना बांधकाम समितीत प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर वातावरण निवळले आणि तणाव कमी झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्ष विलास चाळके यांच्यासह सर्व सभापती उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शशिकांत चव्हाण, तसेच तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी विरोधी सदस्यांशी संवाद साधत समन्वयाची भूमिका घेतली. पालकमंत्री उदय सामंत यांनीही दूरध्वनीद्वारे हस्तक्षेप करून चर्चेला गती दिली.सुरुवातीला स्थायी समितीवरून विरोधक ठाम होते; मात्र बांधकाम समिती देण्याच्या प्रस्तावानंतर त्यांनी माघार घेतली. ठाकरे गटाचे प्रमोद निवळकर यांना बांधकाम व कृषी समितीवर संधी देण्यात आली.
राष्ट्रवादीचे अजय बिरवटकर यांनी सदस्यत्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर त्यांना आरोग्य समितीऐवजी बांधकाम व कृषी समित्यांवर स्थान देत समाधानाचा मार्ग काढण्यात आला.अखेर सर्वानुमते आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर केली.
