रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी बुधवारी (दि. २१) जिल्ह्यात मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी एकूण ४६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी १५८, तर पंचायत समितीसाठी ३१० अर्जांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेसाठी असलेल्या ५६ गटांमधून आतापर्यंत एकूण २२९ अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ४३४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
१६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सुरुवातीला प्रतिसाद संथ असला, तरी अंतिम मुदत जवळ येताच इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. मंगळवारप्रमाणेच बुधवारीही उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयांत अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची रांग लागली होती. बुधवारी राजापूर तालुका वगळता उर्वरित आठ तालुक्यांमधून जिल्हा परिषद गटांसाठी २२९, तर पंचायत समिती गणांसाठी ४३४ अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, पाली पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा संजय कांबळे या महायुतीच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीला निवडणुकीच्या सुरुवातीलाच यश मिळाले आहे. गुरुवारी (दि. २२) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सर्व तालुक्यांमध्ये उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर पात्र व अपात्र अर्जांची संख्या स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी असून, त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी मर्यादित कालावधी मिळणार आहे. २७ जानेवारी रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २८ जानेवारीपासून अधिकृत प्रचाराला सुरुवात होईल. मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, ३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंतच प्रचाराची परवानगी असेल. त्यामुळे अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे.
