Ratnagiri ZP Election Panchayat Samiti Election Update: रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रक्रियेला मंगळवारपासून जिल्ह्यात अधिकृत सुरुवात झाली. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी एकूण २८४ नामनिर्देशन अर्ज उचलले. मात्र, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार निवडणूक कार्यक्रमाची माहिती राजपत्रासह स्थानिक वृत्तपत्रे, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालये, गट विकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समितीनिहाय स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत १६ ते २१ जानेवारीदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज नेले असले तरी प्रत्यक्ष नामनिर्देशन प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नसल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवसांत अर्ज दाखल करण्याचा वेग वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.