Ratnagiri Zilla Parishad Panchayat Samiti Election: रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही कोणत्याही विरोधी पक्षाचा अथवा उमेदवाराचा अर्ज दाखल न झाल्याने ही निवड निश्चित झाली.

रत्नागिरी मतदार संघ उद्योगमंत्री उदय सामंत यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. यापूर्वी झालेल्या नगर परिषद निवडणुकांतही शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले होते. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वीच पाली – नाणीज गण बिनविरोध जिंकून सामंत यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच डॉ. पद्मजा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाणीज गणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दुपारपर्यंत एकही अर्ज न आल्याने डॉ. कांबळे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. प्रत्यक्ष मतदानाआधीच शिवसेनेने पहिली जागा आपल्या खात्यात जमा केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. पद्मजा कांबळे यांच्या या बिनविरोध विजयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जागांवर शिंदे शिवसेनेचे पारडे जड राहण्याची शक्यता व्यक्त होत असून, विरोधकांसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.