रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा अखेर खाली बसला आहे. जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद गट आणि ९ पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे दोन दिवसांनी पुढे ढकललेली ही निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर आली आहे.
लोकशाहीचा हा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी केली आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य सभा आणि शक्तिप्रदर्शनाऐवजी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद यावर सर्वच पक्षांनी भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिपळूणमधील नियोजित सभा रद्द झाली, तर शिंदे शिवसेनेच्या दोन मोठ्या सभा वगळता उर्वरित पक्षांनी वाडी-वस्ती, गल्लोगल्ली प्रचार करण्याची रणनीती अवलंबली.
कोकणात वाडीप्रमुख, गावकरी आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा असलेला प्रभाव लक्षात घेऊन नेत्यांनी थेट मतदारांच्या दारात पोहोचणे पसंत केले. मुंबईत वास्तव्य असलेल्या मतदारांना मतदानासाठी गावी आणण्याचे विशेष नियोजनही सर्वच राजकीय पक्षांनी केले होते.
प्रचाराच्या रणांगणात शिंदे शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत, रामदास कदम, योगेश कदम आणि किरण सामंत यांनी आघाडी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार शेखर निकम, तर ठाकरे शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव आणि खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराचा किल्ला लढवला. मात्र, अंतिम निकालाची खरी किल्ली ही प्रत्येक तालुक्यातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आणि स्थानिक समीकरणांकडेच असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
एकूण मतदार: ११,७३,८९९
मतदान केंद्रे: १,६९३
निवडणूक कर्मचारी: ५,४५५
मतदान यंत्रे (ईव्हीएम): ४,२६६
एकूण उमेदवार:
जिल्हा परिषद गट – १५१
पंचायत समिती गण – ३२१
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलीस बळ: ७६ अधिकारी व १,५२४ पोलीस अंमलदार
होमगार्ड: १,९०० जवान
अतिसंवेदनशील भागांसाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही नजर, विशेष गस्त आणि कडक नाकाबंदी लागू करण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे.
