रत्नागिरी : ग्रामीण भागातील शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व उपक्रमशीलतेला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा सन २०२५–२६ चा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कनिष्ठ व वरिष्ठ प्राथमिक अशा दोन गटांमध्ये तालुकानिहाय एकूण १८ शाळांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद स्तरावरील निवड समितीची बैठक ६ मार्च रोजी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपस्थितीचे प्रमाण, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. २, नवभारत साक्षरता अभियान तसेच शाळांमधील विविध उपक्रम या निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात आली.
कनिष्ठ प्राथमिक गटात मंडणगड तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा गांधी चौक, दापोलीतील आंजर्ले क्र. १, खेडमधील आंबडस सोलकरवाडी, चिपळूणमधील आंबतखोल तांबडवाडी, गुहागरमधील पाचेरीसडा क्र. २ (कवठीवाडी), संगमेश्वरमधील तुरळ सुवरेवाडी, रत्नागिरी तालुक्यातील नाखरे भगवती क्र. २, लांजातील वेसुर्ले आणि राजापूरमधील कोंडीवळे गोतावडेवाडी या शाळांची निवड झाली आहे.
वरिष्ठ प्राथमिक गटात मंडणगडमधील पालघर मराठी, दापोलीतील शिर्दे, खेडमधील चिंचघर दस्तुरी, चिपळूणमधील वालोटी क्र. १, गुहागरमधील वरवेली क्र. १, संगमेश्वरमधील गोठणे पुनर्वसन हातीव, रत्नागिरीतील भोके मायंगडेवाडी, लांजातील इसवली सुतार आणि राजापूरमधील गोखले कन्या शाळा या शाळांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलीमा नाईक, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रकांत सूर्यवंशी, स.रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य विक्रांत रावराणे तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक माधव विश्वनाथ अंकलगे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मानले.
