मतदानाचा टक्का वाढल्याने चित्र अस्पष्ट

या दोन्ही बाबींचा एकत्रित परिणाम मतदानवाढीवर झाला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या झालेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का लक्षणीय प्रमाणात वाढला. रत्नागिरीत नेहा बागकर ही नववधूही  मतदान करताना दिसली.  
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आज झालेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का लक्षणीय प्रमाणात वाढल्यामुळे निकालाबाबतचे चित्र अस्पष्ट झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण सरासरी सुमारे ७२ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीपेक्षा (६३.७ टक्के) त्यात तब्बल  ८ ते १० टक्के वाढ आहे. त्याबाबतची अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. पण ही वाढ कोणाला लाभदायी ठरणार, याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

किरकोळ बाचाबाचीचे प्रसंग वगळता जिल्ह्यात कुठेही गंभीर गैरप्रकार न होता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने, गुहागर तालुका वगळता, ही निवडणूक आघाडी करून लढवली असली तरी गेली सुमारे २५ वष्रे युती असलेल्या भाजप व शिवसेना या राज्याच्या सत्तेतील भागीदारांनी ही निवडणूक प्रथमच स्वतंत्रपणे लढवली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याच्या प्रयत्नांमुळे मतदानाचा एकूण टक्का वाढला असावा, असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील सेनेचे राजन साळवी (राजापूर), उदय सामंत (रत्नागिरी) व सदानंद चव्हाण (चिपळूण) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव (गुहागर) व संजय कदम (दापोली) या पाच आमदारांसाठी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची असल्याने आपापल्या तालुक्यांमध्येत्यांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी कसून प्रयत्न केले. तसेच दीर्घ काळानंतर या निवडणुकीत उतरलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आपली खरी ताकद अजमावण्यासाठी या निवडणुकीचा उपयोग केला आहे. या दोन्ही बाबींचा एकत्रित परिणाम मतदानवाढीवर झाला आहे.

सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात मतदानाचा वेग संथ राहिल्यामुळे एकूण सरासरी १२.७२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामध्ये गुहागर तालुक्यात सर्वात जास्त, १५ टक्के मतदान झाले, तर त्याखालोखाल रत्नागिरी व संगमेश्वर या दोन तालुक्यांनीही (प्रत्येकी १४ टक्के) चांगली सरासरी नोंदवली. सकाळी साडेअकरापर्यंत जिल्ह्याची एकूण सरासरी २९.३५ टक्क्यांपर्यंत पोचली. त्यामध्ये गुहागरने आघाडी (३३.८५) कायम राखली, तर खेड, चिपळूण आणि राजापुरातही मतदानाचा वेग (प्रत्येकी सुमारे ३१ टक्के) वाढला. त्यानंतरच्या दोन तासात, दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण मतदानामध्ये आणखी सुमारे १३ टक्क्यांची भर पडली (४२.८५ टक्के). या काळात मंडणगड आणि संगमेश्वर वगळता उरलेल्या सातही तालुक्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान नोंदले गेले, तर संगमेश्वरात फारच कमी मतदानाची नोंद (३१.७७ टक्के) नोंद झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मात्र मंडणगड वगळता (४७.२४) सर्व तालुक्यांनी टक्केवारीची पन्नाशी पार केली. या दोन तासांत मतदानामध्ये गुहागरला मागे टाकत (५७.५४) चिपळूण तालुक्याने (५८.४१) आघाडी घेतली. तसेच या अन्य सात तालुक्यांनीही कसर भरून काढली.

या निवडणुकीत सेनेमध्ये झालेले तालुका पातळीवरील गटा-तटाचे राजकारण, पक्षांतर्गत बंडखोरी आणि भाजपचा सवता सुभा यावर मात करत जिल्हा परिषदेवरील आपले दीर्घ काळ असलेले वर्चस्व सेना टिकवेल का, या प्रश्नाचे उत्तरयेत्या गुरुवारी होणाऱ्या या निवडणुकीच्या मतमोजणीतून मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ratnagiri zp election