रत्नागिरी: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३५ हातखंबा जिल्हा परिषद गटात लोकशाहीची खुलेआम पायमल्ली सुरू असल्याचा खळबळजनक आरोप उमेदवार परशुराम मारुती कदम यांनी केला आहे. मतदारांना सर्रास पैसे वाटून मते विकत घेण्याचे प्रकार सुरू असून, काही ठिकाणी धमकावण्याचाही प्रकार होत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणी अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. या तक्रारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच राजकीय खळबळ उडाली आहे.
कदम यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून हातखंबा जि.प. गटात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आमिष दाखवून मतदारांना प्रभावित केले जात आहे. यामुळे मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असून निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा स्पष्ट भंग होत आहे.
“लोकशाही मूल्यांना तडा जात आहे. सामान्य मतदार भीतीखाली मतदान करण्यास भाग पाडला जात असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची, संबंधित व्यक्तींवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार, दोषींवर कारवाई होणार का, की पैशांच्या जोरावर लोकशाही गप्प बसणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हातखंबा गटातील या आरोपांमुळे निवडणूक रणधुमाळीला आता कायदा विरुद्ध बेकायदा असा रंग चढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शिवसेनेतुन बंडखोरी करत बाहेर पडलेले परशुराम कदम यांनी आता पक्षातून हकालपट्टी झाल्यावर पालकमंत्री उदय सामंत यांना उघड उघड आव्हान दिल्याने आता या निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे.

