एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणानंतर विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपासहीतच सत्ताधारी शिवसेनेनंही ओवेसी यांच्यावर टीका केली असतानाच आता आमदार रवी राणा यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

दिल्लीमधून या प्रकरणासंदर्भात आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसाठी जारी करताना एका व्हिडीओमधून राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी राजेंच्या विचारांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात संभाजी नगर येऊन ओवेसी फुलं वाहतात. माझ्या राजकीय जीवनामध्ये आतापर्यंत ती कबर कोणी उघडली, तिथं फुलं वाहिली हे मी फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पाहिलेलं आहे,” असं राणा म्हणालेत.

यापुढे बोलताना त्यांनी स्वत:वर आणि खासदार पत्नी नवनीत राणा यांच्याविरोधात राज्य सरकारने हनुमान चालिसा प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याची आठवण करुन देत उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. “आम्ही हनुमान चालिसा वाचतो तर खासदार आमदाराला तुरुंगात टाकलं जातं. देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे. जर तुम्ही हिंदुत्वाच्या एवढ्या गोष्टी करता, खरं तुम्ही हिंदू असाल तर हनुमान चालिसाचं वाचन करुन सभेची सुरुवात कराल की संभाजीनगरमध्ये औरंगजेबच्या कबरवर फुलं वाहायला जाल, असा महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूंचा तुम्हाला सवाल आहे,” असं राणा म्हणालेत.

खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांवर टीका होऊ लागल्यानंतर खासदार जलील यांनी स्पष्टीकरण दिले. जलील म्हणाले, खरे तर खुलताबादमध्ये अनेक दर्गा आहेत. त्यामुळे एकाचे दर्शन घेतले, दुसऱ्याकडे दुर्लक्ष केले असे करता येत नसते. त्यामुळे याचे वेगळे अर्थ काढण्यात येऊ नयेत असे ते म्हणाले. कबरीसमोर नतमस्तक होताना जलील यांनी भगवा रुमाल परिधान केला होता. या विषयी बोलताना ते म्हणाले,”भगवा, हिरवा, निळा सारे रंग माझे आहेत.”

औरंजेबाच्या कबरीसमोर आम्ही कधी नतमस्तक झालो होतो, असा सवाल करणारे खासदार जलील यांची जुनी चलचित्रेही समाजमाध्यमातून आवर्जून फिरत होती. या अनुषंगाने बोलताना माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी, शाळा बांधताय याबद्दल अभिनंदन, पण औरंगजेबाच्या कबरीसमोर नस्तमस्तक होणे ही कृती तेढ निर्माण करणारी असल्याचे म्हटले आहेत.