scorecardresearch

“उद्धव ठाकरेंना जनाब म्हणतात कारण…” रवी राणा टीका करताना नेमकं काय म्हणाले?

सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे, परंतु यावरून अता उद्धव ठाकरेंवर टीका सुरू आहे.

Ravi Rana Uddhav thackeray
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी भाजपाची माफीची मागणी धुडकावली आणि म्हणाले “माफी मागायला माझं नाव सावरकर नाही, मी गांधी आहे”. राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून भाजपाला लक्ष्य करत आहेत. दरम्यान, आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही राहुल गांधींना विरोध होऊ लागला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या जाहीर सभेत राहुल यांना ठणकावलं. “सावरकरांचा अपमान सहन करणार नाही”, असा इशारा उद्धव यांनी राहुल गांधींना दिला.

परंतु उद्धव यांच्या भूमिकेनंतर राज्यातले भाजपा नेते, शिंदे गट आणि एनडीएतील मित्रपक्ष उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. आता आमदार रवी राणा यांनीदेखील उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. रवी राणा म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी काल जाहीर सभेत सांगितलं, सावरकर माझे दैवत आहेत. परंतु राहुल गांधी मात्र वारंवार सावरकरांचा अपमान करत आहे. असं असेल तर उद्धव ठाकरेंच्या दैवताचा अपमान सुरू आहे. यावरून उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीसोबतची लाचारी दिसत आहे.

हे ही वाचा >> “भाजपा-मित्रपक्ष शिंदे गटाची ताकद संपवत आहेत”; आमदार रोहित पवारांचा दावा, म्हणाले, “आठवलेंच्या कृतीकडे पाहा”

…मग उद्धव ठाकरेंची भूमिका कळेल : राणा

राणा म्हणाले की, मला वाटतंय, उद्धव ठाकरे लोकांची दिशाभूल करत आहेत. उद्धव ठाकरे यांना आता जनाब म्हणतात, त्या जनाबाप्रमाणे ते आता पूर्णपणे महाविकास आघाडीत कन्वर्ट झाले आहेत. कन्वर्ट झालेल्या उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारची दुटप्पी भूमिका दाखवून लोकांना गोंधळात टाकू नये. राहुल गांधी त्यांचं दैवत आहेत की सावरकर याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. त्यानंतर आपल्याला कळेल की त्यांची नेमकी भूमिका काय आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 16:53 IST

संबंधित बातम्या