राज्यात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून राजकीय कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत. मशिदींवरील भोंगे हटविले नाही, तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात दिला होता. त्यानंतर भाजपाही आक्रमक झाली आहे. हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करावे, अन्यथा पुढल्या काळात मी आणि खासदार नवनीत राणा मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी दिला होता.

रवि राणा यांच्या इशाऱ्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांकडून रवि राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेनेला उगाच डिवचण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लागलेली साडेसाती संपवण्यासाठी हनुमान चालिसा वाचली पाहिजे, अशी प्रतिक्रिया आमदार रवि राणा यांनी दिली आहे.

 “राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देऊ अशी प्रार्थना आज करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व शिवसैनिकांसोबत बसून राज्याच्या समृद्धीसाठी आणि उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून लागलेली साडेसाती संपवण्यासाठी हनुमान चालिसा वाचली पाहिजे. दिशाहिन झालेल्या उद्धव ठाकरेंना योग्य दिशा दाखवण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचली पाहिजे,” असे आमदार रवि राणा यांनी टिव्ही९ मराठीसोबत बोलताना म्हटले.

“माझा विरोध करुन उपयोग नाही. मी श्रीरामाचा आणि हनुमानाचा आशिर्वाद घेऊन मातोश्रीवर येणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावली तरीही मला कोणी रोखू शकत नाही. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा वाचली नाही तर मातोश्री रावणाची लंका होईल. रामाच्या विचारांचे राज्य हवे असल्यास हनुमान चालिसा वाचण्याची गरज आहे,” असे रवि राणा म्हणाले.

“महाराष्ट्राच्या समृद्धी, विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, सर्वसामान्य बेरोजगारांच्या हितासाठी हनुमान चालिसा वाचण्याची गरज आहे. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर हनुमान चालिसा वाचली तर महाराष्ट्रावर आलेले संकट, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लागलेली साडेसाती नष्ट करता येईल. मातोश्रीच्या बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी हनुमान चालिसा वाचावी,” असे रवि राणा यांनी म्हटले.

“त्यांनी मला तारिख आणि वेळ द्यावी त्यावेळी मी मातोश्री बाहेर जाऊन नक्की हनुमान चालिसा म्हणणार. मी मुंबईची मुलगी आहे आणि विदर्भाची सून आहे. दोन्ही ताकदी माझ्या पाठीशी आहेत. मला कोणीही थांबवू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली.