Ravindra Chavan : भारतीय जनता पक्षाचे नेते रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आज (१ जुलै) निवड करण्यात आली आहे. भाजपाचे नेते तथा केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण हे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्यावर आता ही जबाबदारी देण्यात आली आहे. रविंद्र चव्हाण यांच्या निवडीबाबत भाजपाने मुंबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत फक्त रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. दुसरे कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे रविंद्र चव्हाण यांची भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांची निवड महत्वाची मानली जात आहे. रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेले आहेत. तसेच रविंद्र चव्हाण हे प्रभावी नेते असून त्यांचा तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांबरोबर दांडगा जनसंपर्क असल्याचं बोललं जातं.
रविंद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
रविंद्र चव्हाण हे विद्यार्थीदशेतच राजकारणात सक्रिय झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २००० मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेत चव्हाण नगरसेवक म्हणून निवडून आले आणि स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत रविंद्र चव्हाण हे डोंबिवली मतदारसंघातून निवडून आले. यानंतर त्यांनी सलग चार वेळा या जागेवरून विजय मिळवला. २०१६ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते मंत्रीही होते.