Pune Jain boarding house land Scam Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून माजी आमदार व शिवसेना (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. मोहोळ यांनी आपल्या व्यावसायिक साथीदारांच्या व मित्रांच्या संगन्मताने जैन मंदिराची जमीन लाटल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. ‘जाग्यामोहोळ’ असं एक व्यंगचित्र त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे. तसेच ते म्हणाले, “सदर जमीन विक्रीचा घोटाळा हा मोहोळ यांच्या नेतृत्वाखालीच झाला आहे.”

रवींद्र धंगेकर यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “मुरलीधर मोहोळ दोषी आहेत. तसेच तो जमीन विक्रीचा घोटाळा हा मोहोळ यांच्या नेतृत्वाखालीच झाला आहे. त्या व्यवहारातील सर्वजण, सिस्टिममधील सगळेजण मोहोळ यांचे मित्र आहेत. ती संपूर्ण प्रणाली त्यांचीच आहे. बुलढाणा सहकारी बँक, त्या बँकेचे व्यवस्थापक, बँकेचे संचालक हे सगळे मोहोळांचे साथीदार असून सगळे एकत्र आहेत. गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीशी त्यांचे संबंध आहेत. या सगळ्यांनी मिळून जैन मंदिर गहाण ठेवलं आहे, जैन धर्माच्या भावना दुखावल्या आहेत.”

“तुम्ही परमेश्वर गहाण ठेवलात”

शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर म्हणाले, “एवढं सगळं करून मुरलीधर मोहोळ म्हणतायत की ‘मी जैन धर्माबरोबर आहे, मी भावना दुखावलेल्या नाहीत.’ खरंतर त्यांनी मंदिर गहाण ठेवलं आहे, तुम्ही त्यांच्या जमिनी खाल्ल्या आहेत, तुम्ही त्यांचा देव खाल्ला, तुम्ही परमेश्वर गहाण ठेवलात, इतके मोठे झालात का तुम्ही? हे पाप करून ते एकदाही म्हणाले नाहीत की जैन मंदिर वाचलं पाहिजे. हा व्यवहार थांबला पाहिजे.”

…तर मी मोहोळला जाऊन मुरलीधर मोहोळांचा सत्कार करेन : धंगेकर

“मुरलीधर मोहोळ यांनी म्हणायला हवं होतं की हा व्यवहार मी रद्द करायला लावेन, मी या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करायला लावेन. ज्या दिवशी या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, त्या दिवशी मी मोहोळ या गावी जाऊन मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार करेन. त्यांनी उत्तम काम केलं याबद्दल आभार मानेन. जैन धर्माचं मंदिर वाचवलं म्हणून कौतुक करेन.”

‘जाग्यामोहोळ’

रवींद्र धंगेकर यांनी ‘शुभ प्रभात पुणेकर’ असं म्हणत एक व्यंगचित्र एक्सवर शेअर केलं आहे. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा चेहरा असून ‘हे पुण्यातील जागा गिळणारं जाग्यामोहोळ आहे’ अशी टिप्पणी धंगेकर यांनी केली आहे.