लातूर : कुक्कुटपालनासाठी खाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोयापेंड आयात करण्यास पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी नव्याने मुदतवाढ देण्याची शिफारस केल्याने सोयाबीन उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वी सोयापेंडीला दिलेल्या आयातीच्या परवानगीनंतर सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली होती. नव्याने आयातीस मुदतवाढीच्या शिफारसीनंतर बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल ३५० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

सोयाबीनचे वाढते भाव परवडणारे नसल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला होता. हा व्यवसाय सावरावा म्हणून विदेशातून १२ लाख टन सोयाबीन पेंड आयात करण्याची मागणी पोल्ट्री उत्पादक संघटनेने केली होती. त्यावर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णयही घेतला होता. त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरात घसरणीवर झाला. केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत केवळ साडेसहा लाख टन सोयापेंड आयात होऊ शकली. त्यानंतर सोयाबीनचे भाव या वर्षी पुन्हा वाढून सात हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. सोयाबीनचा हमीभाव तीन हजार ९५० आहे. त्यापेक्षा चांगला भाव बाजारपेठेत मिळत असल्याने पोल्ट्री उत्पादक संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष बहादूर अली यांनी केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन नव्याने साडेपाच लाख टन सोयापेंड आयातीला ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्याची मागणी केली. तशी शिफारसही मंत्री रुपाला यांनी केल्याचे समजल्यानंतर भाव पुन्हा घसरले आहेत. हवामानातील बदलामुळे ब्राझील, अर्जेटिना आदी देशांत सोयाबीन उत्पादनात घट होत असल्याने देशांतर्गत सोयाबीनचे भाव वाढत आहेत. हे भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने कोणतेही पाऊल उचलले जात नाही. उलट भाव पाडण्यासाठी पावले उचलली जात आहेत. सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून सोयाबीन उत्पादकांची कोंडी केल्याची भावना शेतकऱ्यांत पसरते आहे.

शेतकरी सजग

लातूर बाजारपेठेत गुरुवारी सोयाबीनचा सर्वसाधारण भाव सहा हजार ३०० रुपये क्विंटल एवढा होता. तर पाच हजार ८०० ते सहा हजार ७०० पर्यंत किमान व कमाल भाव राहिले. सोयाबीनच्या भावातील चढ-उतारामुळे शेतकरी आवश्यकतेनुसारच बाजारपेठेत सोयाबीन आणतो आहे. या वर्षी पहिल्यांदाच शेतकरी सोयाबीन विक्रीबाबत सजग झाल्याचे चित्र दिसते आहे.