राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते कामात अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. त्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करून बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली असून भ्रष्टाचार झाला असेल, तर वंचित आघाडीच्या कोणत्याही नेत्याच्या समोर मी हात कलम करायलाही तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

“अकोल्याच्या न्यायालयाने माझ्यावर ४२० गुन्हा दाखल करून चौकशी करा असं म्हटलंय. मला संभ्रम आहे. न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अशा प्रकारे जर चौकशी न करता असे आदेश दिले जात असतील तर फार चुकीचा संदेश नागरिकांसमोर जाईल. सध्या फार भीतीचं वातावरण आहे, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

प्राध्यापक धैर्यवर्धन पुंडकर  हे वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे. त्यात बच्चू कडूंनी अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. “जिल्हा परिषदेचे रस्ते होते. आम्ही वारंवार रस्त्याची मागणी करूनही आम्हाला नावं देण्यात आली नाही. रस्त्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे त्यानंतर निधी टाकता येतो असा शासन निर्णय आहे. तो देखील जिल्हा परिषदेनं ठरवला नाही. त्यामुळे खासदार धोत्रे, रणवीर सावरकर, देशमुख या सर्व आमदारांनी मागणी केली की ग्रामीण भागातले रस्ते बेकार झाले आहेत. येण्या-जाण्याची समस्या निर्माण झाली आहे. लोकांची शेती पडीक राहात आहे. म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या एजन्सीकडून जो निधी जायला हवा होता तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला आहे. फक्त एजन्सी पीडब्ल्यूडी ठेवली आहे. आमदारांनी त्या रस्त्याची मागणी केली होती, त्यानुसार आपण ते केलं. जिल्हा नियोजन समितीमध्ये यासंदर्भात ठराव झाला. यात वंचित आघाडीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार, जिल्हाधिकारी होते. सगळ्यांनी हा ठराव करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता करावा एवढंच झालं आहे. जिल्हा परिषदेची एजन्सी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाची एजन्सी ठेवली. एवढ्यावर मी फसवलं कसं? मी कुणाला फसवलं हेच सिद्ध होत नाहीये. मग अशा प्रकारे न्यायालय निर्णय द्यायला लागले, तर न्याय मागायचा कुठे? एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन निर्णय होत असेल तर याचा आम्ही निषेध करतो. दाखल गुन्ह्यांबाबत आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. यामुळे आम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न झाला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची आम्ही तयारी ठेवणार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

“हे चुकीचं वृत्त पसरवलं जात आहे. यात एक खडगू देखील भ्रष्टाचार झालेला नाही. एक खरगूचं देखील भ्रष्टाचार झाला असेल, तर वंचित आघाडीच्या कोणत्याही नेत्याच्या समोर मी हात कलम करायलाही तयार आहे,” असेही बच्चू कडू म्हणाले.