MLC Election Result : राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजीणी सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. कोकणच्या जागेवर भाजपाचा उमदेवार विजयी झाला आहे तर, नागपूरच्या जागेवर भाजपाला धक्का देत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. याशिवाय अमरावती आणि औरंगाबाद येथील मतमोजणी अद्यापही सुरूच आहे. या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारपरिषदेत प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज ज्या काही निवडणुकी झाल्या, त्या निवडणुकांमध्ये मला अतिशय आनंद आहे की कोकणची शिक्षक मतदार संघाची जागा ती बऱ्याच कालावधीनंतर भाजपाने जिंकली आहे. तिथे निवडून आलेले आमचे आमदार म्हात्रे यांचं आम्ही स्वागतही केलं आहे आणि त्यांचा सत्कारही केला आहे.”

हेही वाचा – Nashik Graduate Constituency Election : “…पण विजयोत्सव साजरा करणार नाही” सत्यजित तांबेंनी केलं जाहीर!

याचबरोबर “नागपूरची जागा आम्ही जिंकू शकलो नाही, आपल्याला कल्पना असेल की नागपूरची जागा शिक्षक परिषदेने लढली. मूळात कोकण आणि नागपूर दोन्ही जागा शिक्षक परिषद लढायची. या दोन्ही जागा भाजपाला लढू द्याव्यात, अशाप्रकारचा आमचा आग्रह होता पण, कोकणात त्यांनी तो आग्रह मान्य केला पण नागपूरची जागा आम्हाला लढू द्या, असा त्यांनी आग्रह केला. आम्ही त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सूचवलं होतं, की शिक्षक परिषद कदाचित निवडून येऊ शकणार नाही, भाजपा लढली तर निवडून येऊ शकेल. पण त्यांचा आग्रह असल्याने त्यांनी जागा लढवली आम्ही समर्थन दिलं. पण त्या ठिकाणी ती जागा निवडून येऊ शकली नाही. याचं निश्चित आम्हाला दु:ख आहे.” असं फडणवीस नागपूरच्या जागेबाबत म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Latest Breaking News Today : अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी; भाजपाचा पराभव

अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मतं मिळालेली नाही –

“अमरावतीच्या जागेबाबत अजून मागेपुढे होतय, आतातरी आम्ही दोन हजार मतांनी मागे आहोत आणि मला असं वाटतं की पहिल्या फेरीत, पहिल्या पसंतीमध्ये कोणीच कोटा पूर्ण करत नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मोजणी तिथे होणार आहे. पण तरीही अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मतं काही मिळालेली नाही. थोडी मतं आम्हाला कमी पडली आहेत, त्यामुळे निश्चित याचा विचार हा पक्ष करेल. विशेषता तिथे बाद ठरलेल्या मतांची जी संख्या आहे, ती फार मोठी आहे आणि विशेषकरून त्यामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमध्ये बाद मतं जास्त आहेत. याचाही एक विचार आम्हाला करावा लागेल.” अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

हेही वाचा – Adani Group : “ज्या कंपनीचे भवितव्य धोक्यात आहे अशा कंपनीशी…”; ‘अदाणी’वरून सचिन सावंतांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल!

सत्यजित तांबेंचे मनापासून अभिनंदन अन् महाविकास आघाडीला टोला –

“मराठवाड्यातही मोठ्याप्रमाणावर चुरस सुरू आहे. पक्ष अतिशय चांगल्याप्रकारे मराठवाड्याची जागा लढला. याचा मला संतोष आहे. याचसोबत नाशिक जो मतदारसंघ आहे, तिथे मी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन करेन. की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांच्याविरुद्ध त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीने केला. परंतु अपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही अतिशय भरघोस मतांनी ते निवडून आले. म्हणून त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन मी करतो.” असं म्हणत महाविकास आघाडीला फडणवीसांनी टोलाही लगावला.

याचबरोबर “एकूणच या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या, तर काही गोष्टी आमच्या अपेक्षेच्या बाहेर झाल्या. त्यामुळे ज्या झाल्या आहेत त्याबाबत आनंद आहे आणि ज्या झाल्या नाहीत, त्या संदर्भात निश्चितच आम्ही चिंतन करू. त्या संदर्भात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ते बघू.” असं शेवटी फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reaction of deputy chief minister devendra fadnavis on the results of the election of teachers and graduates constituencies msr
First published on: 02-02-2023 at 23:39 IST