पं. रविशंकरजी आणि पं. भीमसेन जोशी या दोघांचा ऋणानुबंध १९४० च्या दशकापासूनचा होता. सतारवादनाच्या मैफलीपूर्वी रविशंकरजी मेकअप करायचे. हे ध्यानात घेऊन बाबांनी ‘मॅक्स फॅक्टर’ असे त्यांचे नामकरण केले होते. ‘मेरे बाद कौन कलाकार है’ असे विचारल्यानंतर रविशंकरजी यांना ‘भीमसेन जोशी’ असे उत्तर संयोजकांकडून मिळायचे. ‘ये तो भूत है’ ही रविशंकरजी यांची भावना होती. त्यामुळेच ते बाबांना प्रेमाने ‘भूत’ असे संबोधत असत. दोघांनी एकमेकांना अशी टोपणनावे ठेवली होती.. या दोन दिग्गज कलाकारांमधील प्रेम आणि आदरभावना याला स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी उजाळा दिला. ‘पंडितजींच्या निधनामुळे खरा दिग्गज कलाकार आपल्यातून गेला’, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
हीरकमहोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवामध्ये ज्येष्ठ सतारवादक पं. रविशंकरजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्यावरील लघुपट यावेळी दाखविण्यात आला. त्यानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आपल्या मनोगतातून या दोन दिग्गज कलाकारांमधील ऋणानुबंध उलगडला.
श्रीनिवास जोशी म्हणाले, या दोघांची भेट नेमकी केव्हा झाली हे सांगता येणार नाही. १९४० च्या दशकामध्ये ही भेट झाली असे निश्चितपणे सांगता येईल. बाबा, पं. रविशंकरजी, उस्ताद अली अकबर खाँ, उस्ताद अल्लारखाँ हे प्रतिभावंत आणि गुणी कलाकार एकदा कलकत्ता येथे गेल्यानंतर त्यांचा महिनाभर मुक्काम असायचा. त्यामुळे एकमेकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबरोबरच त्यांच्यामधील दोस्ती घट्ट झाली. त्यांच्यामध्ये सांगीतिक आदानप्रदान होत असे. पूर्वी आम्ही गोपाळ गायन समाज रस्ता येथे राहात असताना पं. रविशंकरजी आमच्याकडे आले होते. पं. रविशंकरजी, बाबा, पु. ल. देशपांडे यांचे एकत्रित छायाचित्र आमच्या संग्रहामध्ये आहे. पं. रविशंकरजी यांची प्रत्यक्ष मैफल मी ८० च्या दशकामध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्येच ऐकली आहे. पंडितजी आणि त्यांचे चिरंजीव शुभ शंकर यांचे एकत्रित वादन झाले होते. आता शुभ शंकर आपल्यामध्ये नाहीत. पण, ही मैफल अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्यावेळी पंडितजींना भेटता आले आणि त्यांचे दर्शन घेता आले.
‘आयटीसी’च्या संगीत रीसर्च अॅकॅडमीने दहा वर्षांपूर्वी पं. रविशंकरजी आणि पं. भीमसेन जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानंतर या दोघांचेही कार्यक्रम सादर झाले. बाबांच्या गायनाच्या वेळेस तंबोऱ्यावर मी होतो. त्यामुळे याप्रसंगी रविशंकरजी यांची मैफल मी अनुभवली होती. हीच या दोघांची शेवटची भेट ठरली. पाच वर्षांपूर्वी पं. रविशंकरजी यांची मैफल पुण्यामध्ये झाली होती. त्यावेळी ते बाबांना भेटण्यासाठी घरी येणार होते. पण, काही कारणांमुळे त्यांना येणे शक्य झाले नाही. पण, या दोघांचे दूरध्वनीद्वारे संभाषण झाले होते, अशा आठवणी श्रीनिवास जोशी यांनी जागविल्या.
बाबांच्या निधनानंतर त्यांचे श्रद्धांजली व्यक्त करणारे पत्र आले होते. ‘माझ्याबरोबरचे सगळे दिग्गज गेले. त्यामध्ये आता भीमसेनजीदेखील सहभागी झाले. त्यांना भेटण्यास मी लवकरच येत आहे’, हा या पत्रातील मजकूर वाचून मलाही गहिवरून आले होते. जून महिन्यामध्ये मी अमेरिकेला गेलो होतो. त्यावेळी पं. रविशंकरजी यांना भेटण्याचे ठरविले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असल्याने मला त्यांना भेटता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त
केली.    

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी</strong>
संगीत, कला आणि संस्कृतीचे ते खरेखुरे दूत होते. त्यांची दैवी प्रतिभा आणि सर्जनशीलता यामुळे त्यांचा तसेच भारतीय शास्त्रीय संगीताचा अमीट ठसा जगावर उमटला. त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग</strong>
जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते असामान्य आणि सर्वात प्रभावी सांस्कृतिक राजदूत होते. त्यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे. भारतमातेने आपला एक सुपुत्र गमाविला आहेच, पण सतार या वाद्यानेही आपला असामान्य वादक गमाविला आहे. त्यांची मानवता आणि असामान्य प्रतिभा यामुळे त्यांनी जगभरात भारताची प्रतिमा उंचावली. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो.

पं. जसराज
रवी शंकर यांची रागांची मांडणी  वैशिष्टय़पूर्ण होती. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताची खोली समजण्यास जगभरातील रसिकांना मदत झाली. त्यांच्या निधनामुळे सांगितीक जगतावरील सूर्याचा अस्त झाला आहे.

पं. शिवकुमार शर्मा
आपण एक वैश्विक संगीतकार गमावला आहे. असे सर्जनशील संगीतकार अभावानेच जन्मास येतात. सुमारे ५० वर्षे त्यांच्यासह माझे ऋणानुबंध जुळलेले होते. एका मैफिलीसाठी जम्मू येथे ते आले असताना मी त्यांना तबला संगत केली होती. ज्यांना दिग्गज म्हणावे असे फार थोडे कलाकार सध्या दिसतात, पं. रविशंकर हे त्यापैकी एक होते.

पं. हरिप्रसाद चौरसिया
पं. रविशंकर यांच्या पहिल्या पत्नी अन्नपूर्णा देवी यांच्याकडे मी आजही बासरीवादन शिकतो. त्यामुळे ही बातमी ऐकून माझे डोळे पाणावले. आम्ही जवळजवळ ५५ मैफिली एकत्रितपणे केल्या. त्यांचे भारतीय शास्त्रीय संगीतावरील प्रेम वादातीत होते. ते अत्यंत मेहनती होते आणि त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील एक तारा निखळला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी
त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीताच्या विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालशी खोलवर जुळलेले त्यांचे नाते हाच आम्हा सगळ्यांचा यापुढे खजिना असेल. या भारतरत्नाने शास्त्रीय संगीतामध्ये दुर्मीळ असे वलय निर्माण केले होते.

ए. आर. रेहमान
भारतीय शास्त्रीय संगीताने आपला अद्वितीय दूत आणि भारताने आपले रत्न गमावले आहे..

माधुरी दीक्षित
रविशंकरजींच्या निधनाचे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला. पाश्चिमात्य जगाला भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख त्यांनीच करून दिली होती.

तौफिक कुरेशी
हे वृत्त ऐकून मी नि:शब्द झालो आहे. त्या असामान्य संगीतकाराच्या निधनाने निर्माण झालेल्या पोकळीमुळे मी व्यथित आलो आहे.

आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई
गंगेच्या काठावरून भारतीय शास्त्रीय संगीत पं. रविशंकर यांनी जागतिक व्यासपीठावर नेले. भारतीय रागांचा परिचय त्यांनी पाश्चिमात्य जगाला करून दिला. सतारीला आगळी झळाळी त्यांनी प्राप्त करून दिली. त्यांच्या निधनाने संगीतविश्वातील एक तारा निखळला आहे.

पं. उल्हास कशाळकर : भारतीय शास्त्रीय संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये पं. रविशंकर यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रतिकूल परिस्थिती असलेल्या काळामध्ये त्यांनी परदेशात आपली कला लोकप्रिय केली. त्यामुळे भारतीय संगीताकडे पाश्चात्य लोक आदराने पाहू लागले.  माझ्या गायन मैफलीला पं. रविशंकरजी अनेकदा आले आहेत. ते माझी भरभरून तारीफ करायचे.

पं. अजय पोहनकर : विश्वविख्यात सतारवादक, थोर चिंतक, महान गुरू आणि संगीतामध्ये अनेक प्रयोग करणारे श्रेष्ठ अष्टपैलू कलाकार पं. रविशंकरजी हे खऱ्या अर्थाने भारतरत्न होते. सतार या वाद्याबरोबरच शास्त्रीय संगीताला परदेशामध्ये पोहोचविण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. त्यांची मैफल ऐकण्याचा योग अनेकदा माझ्या भाग्यामध्ये आला. अशी सतार पुन्हा ऐकायला मिळणार नाही. ही संगीत क्षेत्राची मोठी हानी आहे.