बंडखोर आमदार संतोष बांगर यांना संताप अनावर; व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल

कामगार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचं जेवण पुरवल्याने बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे.

बंडखोर आमदार संतोष बांगर यांना संताप अनावर; व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल
संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाच्याच कानशिलात लगावली!

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला ठाकरे गटात असलेल्या बांगर यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी शिंदे गटातील आमदारांनी परत येण्याची विनंती केली होती. पण अवघ्या काही दिवसांत स्वत: संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. दरम्यान, शिंदे गटात सामील झाल्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला.

बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून हिणवलं जात असल्याने संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाले होते. जो आपल्याला गद्दार म्हणेल, त्याच्या कानाखाली जाळ काढावा, अशा आशयाचं विधानही त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या घटनेनंतर बंडखोर आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मध्यान्ह भोजन योजनेद्वारे कामगारांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिलं जात असल्याने बांगर यांनी एका व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

हेही वाचा- “हा घातपात असेल तर…” विनायक मेटे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यानंतर चंद्रकांत पाटलांच विधान!

खरं तर, राज्य सरकारने कामगार मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत कामगारांना दुपारचं जेवण पुरवलं जातं. या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारचं जेवण द्यायला हवं? याची यादीही सरकारने ठरवली आहे. मात्र, संबंधित कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचं जेवण कामगारांना पुरवलं जात असल्याचं बांगर यांनी उघडकीस आणलं आहे. आमदार बांगर यांनी संबंधित उपहारगृहात जाऊन कामगारांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची पाहाणी केली आहे.

हेही वाचा- “…तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा धमकीवजा इशारा

यावेळी कामगारांना पुरवलं जाणारं निकृष्ट दर्जाचं जेवण पाहून बांगर यांना संताप अनावर झाला. त्यांनी उपस्थित असलेल्या उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला जाब विचारला, पण व्यवस्थापक काहीही उत्तरं देऊ शकला नाही, त्यामुळे बांगर यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे. तसेच ज्या कंत्राटदाराला मध्यान्ह भोजन पुरवण्याचं कंत्राट दिलं आहे, त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं, अशी मागणी बांगर यांनी केली. कंत्राटदारावर योग्य ती कारवाई न झाल्यास एकही कर्मचारी इथे राहू देणार नाही, असा धमकीवजा इशाराही बांगर यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“शेतकरी आत्महत्या ही सर्वात दुर्दैवी बाब”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली खंत
फोटो गॅलरी