शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) घोटाळा झाला असून त्यात बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ताधारी शिंदे गटातील आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्र सोडलं आहे. सर्व बंडखोर आमदार आता वॉशिंग मशिनमध्ये गेले असल्याची टीका त्यांनी केली आहे.

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं समोर येत आहेत, यावर प्रतिक्रिया विचारली असता पेडणेकर म्हणाल्या, मी काहीही सांगणार नाही. पण सगळे बंडखोर आमदार आता वॉशिंग मशिनमध्ये गेले आहेत. त्यांच्यामागे ईडी लावून त्यांना सामावून घेण्यात आलं आहे. आता ते सरकार म्हणून काय करतात, ते पाहूयात.

हेही वाचा- पत्रा चाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

खरंतर, काल रात्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळील गुलमोहराचं झाड उन्मळून पडलं आहे. हे झाड बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: लावलं होतं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

हेही वाचा- टीईटी घोटाळ्यातील आरोपांवरून चंद्रकांत खैरेंचा अब्दुल सत्तारांना खोचक टोला; म्हणाले, “सत्तारांनी आता…”

नीति आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागच्या रांगेत उभं केल्याच्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. हा महाराष्ट्राच अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “अशाप्रकारे महाराष्ट्राचा अपमान पहिल्यांदाच होतोय, असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचा अनेकदा अपमान होतोय, केला जातोय. राज्यपालांनी तर महाराष्ट्राचा अपमान करण्याची सुपारीच घेतली आहे. देशात सर्वात जास्त महसूल महाराष्ट्रातून जातो, असं असूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागच्या रांगेत उभं केलं जात आहे. यावरून काय समजायचं? दोस्त-दोस्त ना रहा?” असंही पेडणेकर यावेळी म्हणाल्या.