पुणे : विधानसभेत अविश्वास प्रस्ताव मांडताना गटनेत्याचा पक्षादेश (व्हीप) महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. या वेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहणार असून, बंडखोर आमदारांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘विधानसभेच्या अध्यक्षपदी अजूनही नरहरी झिरवळ आहेत. कायद्याने त्यांना अधिकार असल्याने, त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांची आम्ही बैठक घेऊन, एकत्रित अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहोत. पक्ष म्हणून विधानसभेतील व्हिप आणि संघटनात्मक काम या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे गटनेत्याने दिलेला व्हीप आमदारांना पाळावाच लागणार आहे.

प्रस्तावाच्या वेळी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयावरही ही प्रक्रिया अवलंबून आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इतके दिवस ‘विशेष काळजी’ घेण्यात आली. मात्र, सभागृहात आल्यानंतर हे ‘विचारवंत’ (बंडखोर आमदार) काय करणार आहेत, याकडे लक्ष राहणार आहे. सभागृहात आल्यानंतर या आमदारांच्या मतप्रवाहात बदल झालेला दिसेल, असेही पवार म्हणाले.

राज्यपालांनी कोणाला पेढा भरवताना पाहिले नाही – शरद पवार
विधिमंडळ सभागृहात १९६७ ते १९९० या कालावधीत मी होतो. अनेक वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. या कालावधीत राज्यपालांनी कोणाला पुष्पगुच्छ किंवा पेढा भरवताना पाहिले नाही. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्यावेळी एका आमदाराकडून शपथविधीची सुरुवात इतर नावाने केल्याने कोश्यारी यांनी हटकले होते. त्या वेळी कोश्यारी यांनी माझा दाखला दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतांना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांची नावे घेत सुरुवात केली. त्यांना कोणीही हटकले नाहीच, याउलट कोश्यारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, अशा शब्दांत पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना खोचक टोला लगावला.

खेळात राजकारण आणत नाही
राज्य कुस्तीगीर संघटनेचा मी अध्यक्ष असलो तरी खेळ स्पर्धा आयोजित करणे, खेळाडूंना मदत करणे, त्यांना चांगल्या सुविधा, प्रशिक्षण मिळवून देणे यासाठी साहाय्य केले. राहुल अवारे, अभिजित कटके, उत्कर्ष काळे आदी खेळाडू यांचे खेळ आणखी चांगले होण्यासाठी त्यांना मदत केली. काही खेळाडूंना वैद्यकीय मदत केली, तरी कुस्तीगीर संघटना बरखास्तीचा निर्णय का घेण्यात आला? खेळात आम्ही कधी राजकारण आणत नाही, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebel mla will change mindset ncp leader sharad pawars big statement before assembly speaker election pune print news rmm
First published on: 02-07-2022 at 22:29 IST