Rebel MP Sanjay Jadhav targeted Sanjay Raut : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत काल (२२ जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षांतर करणाऱ्या बंडखोर खासदारांबद्दल ठाकरेसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरत त्यांच्याविरोधात ऑपरेशन तुडवा राबवण्याचे आवाहन केले. संजय राऊत यांच्या याच विधानाचा आता खासदार संजय जाधव यांनी खरपूस समाचार घेतला असून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सभेला संबोधित करताना खासदार संजय जाधव म्हणाले, “राजकारणात आपल्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप होत असतात. ते संयमाने सहन करायचे असतात. जिथे उत्तर द्यायची गरज आहे, तिथे आम्ही नक्कीच उत्तर देऊ. कोणी शिंगावर आले, तर त्यांना शिंगावर घेऊ.” पुढे संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेताना त्यांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या खासदारांची बाजू घेतली. “राऊतांनी थेट तुडवायला सांगितले; पण अरे, तू काय तुडवणार आहेस आम्हाला?” अशा आक्रमक आणि एकेरी भाषेत जाधव यांनी राऊतांवर तोफ डागली.
संजय राऊत मोठे वक्ते
ते पुढे म्हणाले, “संजय राऊत हे मोठे वक्ते आहेत. देशाच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी उंची निर्माण करणाऱ्या व्यक्तीने किमान अशा ‘तुडवण्याच्या’ भाषेचा वापर तरी करू नये. तुम्हाला स्वतःला कधी प्रत्यक्ष निवडणूक लढवणे काय असते, हे माहीतच नाही. सर्वसामान्य लोकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्यांच्या गरजा काय आहेत, हे फक्त जनतेतून थेट निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीलाच कळू शकते. आम्ही थेट जनतेच्या दरबारातून निवडून आलो आहोत, हे त्यांनी विसरू नये”, असा थेट टोला संजय जाधव यांनी लगावला.
“पक्षात नव्याने आलेल्या काही लोकांमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. तसंच नेता ते कार्यकर्ता, सर्वांचीच मानसिकता विकासाच्या दृष्टीकोनातून सत्ताधारी पक्षात जाण्याची होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला”, अशी भावना खासदार संजय जाधव काल माध्यमांसमोर यांनी व्यक्त केली.
