इन्सुली जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात दोघा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. या एका जागेसाठी नऊ उमेदवारांनी ११ नामनिर्देशनपत्रे दाखल करून पोटनिवडणुकीत धमाल उडवून दिली आहे. पत्रकार कै. नंदू पेडणेकर या काँग्रेस जिल्हा परिषद सदस्याचे अकाली निधन झाल्याने इन्सुली जिल्हा परिषद पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसने गुरुनाथ पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे गंगाराम ऊर्फ तात्या वेंगुर्लेकर व दत्ताराम ऊर्फ नाना पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त करीत काँग्रेस व अपक्ष उमेदवारी जाहीर करीत नामनिर्देशनपत्र दाखल करून शक्तिप्रदर्शनही केले. काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी भरल्याने काँग्रेस गटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महादेव तथा दिलीप सोनुर्लेकर व उल्हास हळदणकर, शिवसेनेतर्फे घनश्याम केरकर, भाजपतर्फे शांताराम आकेरकर आणि मनसेतर्फे गुरुदास गवंडे व सुनील आचरेकर यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. या मतदारसंघात माजगाव, चराठा, इन्सुली, निगुडा, मदुरा, रोणपाल व पाडलोस गावांचा समावेश असून इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी जिल्हा परिषद मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसअंतर्गत बंडोबांना थंड केले जाईल, अशी अपेक्षा असून उमेदवारी मागे घेणार नाही, असे बंडोबांचे सांगणे आहे.