मोहन अटाळकर

अमरावती : महाराष्ट्रात हनुमान चालिसा पठण केल्यावर गुन्हा दाखल होत असताना आम्हाला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा पठण करा, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आवाहन आम्ही स्वीकारत आहोत, आमची काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा पठणाची तयारी आहे. मात्र, त्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करावे, असे आवाहन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा दिले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, महाराष्ट्रात आज अनेक समस्या आहेत. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई, विजेची समस्या यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. मात्र, नागरिकांच्या समस्यांवर एक शब्दही मुख्यमंत्री जाहीर सभेत बोलत नाहीत. केवळ विरोधकांवर टीका करण्यासाठी मुख्यमंत्री जाहीर सभा घेतात, हे योग्य नाही. ओवैसी औरंगाबादमध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहतात. त्यासंदर्भात मुख्यमंत्री जाहीर सभेत एक शब्दही बोलले नाहीत. आम्ही हनुमान चालिसा पठण केले तर मुख्यमंत्र्यांना त्रास होतो. यामागचे काय कारण आहे, असा सवालही नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केला आहे.

उल्लेखनीय आहे की, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपावरून राणा दाम्पत्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून रवी राणा यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी घाईघाईने आरोपपत्र दाखल केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.