रत्नागिरी : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पहिला जाहीर मेळावा उद्या  (१० जुलै)  रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हा प्रमुख विलास चाळके व तालुकाप्रमुख प्रदीप ऊर्फ बंडय़ा साळवी यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संघटनेसोबत राहण्याचा निर्णय रत्नागिरी तालुका शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यापुढे पक्षात राहतील त्या सर्वाना घेऊन भविष्यात पुढे जायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनुष्यबाण निशाणी घेऊन उभे राहणाऱ्या सर्व उमेदवारांना विजयी करून भगवा झेंडा फडकवायचा आहे. त्या दृष्टीने  शिवसेना बळकट करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे. भातशेतीची कामे सुरू असल्याने यापूर्वी दोन वेळा आयोजित केलेला मेळावा स्थगित केला होता. आता ही कामे पूर्ण होत आली असल्याने उद्या मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार डॉ. राजन साळवी यांचा या मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे. खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.