रत्नागिरी – नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा कोकणाला, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटकांची मोठी पसंती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. गणपतीपूळे, भाट्ये, आरे-वारेसह जिल्ह्यातील प्रमुख समुद्रकिनारे पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेले असून गणपतीपूळे येथे रेकॉर्ड ब्रेक गर्दीची नोंद झाली आहे.
गणपतीपूळे येथे सुट्टीचा काळ सुरू होताच हजारो पर्यटक दाखल झाले. परिणामी परिसरातील हॉटेल्स, लॉज तसेच निवासी योजनांमधील सर्व खोल्या ‘हाऊसफुल्ल’ झाल्या. निवासाची व्यवस्था न मिळाल्याने अनेक पर्यटकांची गैरसोय झाली. काहींनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. गणपतीपूळे परिसरातील घरांच्या पडव्या, अंगण तसेच मोकळ्या जागांमध्ये पर्यटकांनी तात्पुरता मुक्काम केल्याचे दृश्य दिसून आले.
दरम्यान, थंडीचा जोर वाढलेला असतानाच अनेक पर्यटकांना योग्य निवारा न मिळाल्याने अडचणींचा सामना करावा लागला. रात्रीच्या वेळी थंडी अधिक तीव्र होत असल्याने कुटुंबांसह आलेल्या पर्यटकांचे विशेष हाल झाले.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणपतीपूळे आणि अन्य पर्यटनस्थळी अतिरिक्त पोलीस कर्मचारी, वाहतूक नियंत्रण व गस्त वाढवण्यात आली आहे.
एकीकडे पर्यटनामुळे स्थानिक व्यावसायिकांना चांगलीच उलाढाल होत असली, तरी नियोजनाअभावी निर्माण झालेल्या अडचणींमुळे प्रशासनासह पर्यटकांनाही ताण सहन करावा लागत आहे. पुढील काळात पर्यटन नियोजन अधिक सक्षम करण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
