‘कृष्णा’ची रणधुमाळी शिगेला

कृष्णा सहकारी साखर कारखान्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. कृष्णाकाठचे राजकारण ढवळून निघताना मातबर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखान्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. कृष्णाकाठचे राजकारण ढवळून निघताना मातबर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, आज ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी सत्ताधारी संस्थापक पॅनेलला शेकापचा पाठिंबा जाहीर केला.
डॉ. सुरेश भोसलेंच्या सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा देत माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी अगदी सुरुवातीलाच उघड भूमिका घेत भोसलेंचे पारडे जड करण्याचा प्रयत्न केला आहे. मुद्देसूद टीकाटिपणी व आरोपांनी प्रचारात आघाडी घेणारे अविनाश मोहिते हे एकाकी दिसत असले, तरी सभासदांमध्ये त्यांच्या पॅनेलबाबत सकारात्मक चर्चा दिसून येत आहे. उंडाळकरांनी भोसलेंसाठी अगदी सुरुवातीलाच उघड भूमिका घेतल्याने आता, मदनराव व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलसाठी आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उघड भूमिका घेणार की काय? याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. प्रचारासाठी अवघा आठवडाच उरला असल्याने प्रचारात रंग भरू लागला असून, उमेदवारांसह त्यांच्या समर्थक कार्यकत्रे पायाला भिंगरी लावून आपल्या पॅनेलच्या विजयासाठी अविरत परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निश्चित झालेल्या उमेदवारांसाठी चिन्ह वाटप करण्यात आले. या वेळी तिन्ही पॅनेलने स्वतंत्रपणे केलेल्या मागणीनुसार चिन्ह वाटप करण्यात आले. यात कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला ‘नारळ’, कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला ‘कपबशी’ तर माजी अध्यक्ष मदनराव मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील यशवंतराव मोहिते रयत पॅनेलला ‘पतंग’ हे चिन्ह मिळाले.
एकमेव अपक्ष उमेदवार असलेल्या महिंद्र ज्ञानू मोहिते यांना ‘शिट्टी’ हे चिन्ह देण्यात आले. ते अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Recrimination in krishna cooperative sugar factory election

ताज्या बातम्या