आचारसंहितेच्या काळात कंत्राटी भरती केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे, तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले. त्यामुळे डॉ. बोल्डे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांनी निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना रुग्णालयातील रक्तपेढी संक्रमण अधिकारी या पदावर कंत्राटी पद्धतीने भरती केली. कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात न देता उमेदवाराला थेट मुलाखतीला बोलावून एकाला नियुक्ती दिली. यातही चुकीच्या तारखांचा उल्लेख करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत चर्चा झाल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवलकिशोर राम यांनी चौकशीचे आदेश दिले. आचारसंहिता सुरू असताना शासकीय किंवा खासगी कोणत्याही प्रकारची भरती करता येत नाही, असे स्पष्ट आदेश असताना डॉ. बोल्डे यांनी भरती केल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत राम यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिवानंद टाकसाळे यांना डॉ. बोल्डे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. बोल्डे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणार असून, आरोग्य विभागाकडून शिस्तभंग अंतर्गत निलंबन कारवाई होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.