वाढवण परिसरात दुर्मीळ प्रजातीच्या मत्स्य संपदेचे वास्तव्य
पालघर : वाढवण येथे एका मच्छीमार बांधवाला उडणारा पाखरू मासा (फ्लाईंग फिश) मिळाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच मंगळवारी वरोरमधील विकास भोईर याना रेड टूथ ट्रिगर फिश हा विशिष्ट मासा मिळाला आहे. शास्त्रीय भाषेत या माशाला ‘ओडोनस नायगर’ असे नाव आहे. त्यामुळे वाढवण परिसर दुर्मीळ प्रजातीच्या मत्स्य संपदेचे ठिकाण असल्याचे अधोरेखित होत आहे.
अशा प्रकारचा मासा डहाणू व पालघरमध्ये आढळल्याची नोंद यापूर्वी झालेली नसून प्रथमच असा मासा सापडल्याने या माशाबाबत कुतूहल निर्माण झाले असून सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. रंगाने निळा—जांभळा असणारा हा मासा त्याच्या स्वभावानुसार रंग देखील बदलू शकतो. कधी तो गडद निळा तर कधी फिकट हिरवादेखील दिसतो.या माशाचे दात लाल रंगाचे असल्यामुळे त्याला ‘रेड टूथ’ अस देखील म्हटले जाते. स्वभावाने हा मासा आक्रमक असून त्याची बारा इंचपर्यंत वाढ होते.
प्रवाळ खडकांची रांग असलेल्या ठिकाणी या माशांचे वास्तव्य असते. ज्या ठिकाणी पाण्याला प्रवाह जास्त असतो अशा अधिवासात राहण्यासाठी हे मासे विकसित झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे एखाद्या खाच खळग्यात ते शिरून त्याच्या शेपटीचा उपयोग स्वत: ला अडकवून ठेवण्यासाठी करतात आणि दगडांमधील खाच खळग्यांत हे अंडी देतात आणि पिल्ले बाहेर येईपर्यंत त्यांचे रक्षण करतात. गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात वैविध्यता असलेली मत्स्य प्रजाती आढळत आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्य सुबत्ता टिकविण्यासाठी येथील क्षेत्र संरक्षित करणे आवश्यक असल्याचे प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक भूषण भोईर यांनी म्हटले आहे.
प्रवाळ खडकांची रांग असल्याचा दावा
या माशाच्या अस्तित्वामुळे वाढवण येथील समुद्रात मोठय़ा प्रवाळ खडकांची रांग असल्याचा दावा पर्यावरण व मत्स्य अभ्यासक करीत आहेत. वाढवण येथील समुद्र परिसरात अलीकडे आढलेल्या दुर्मीळ मत्स्यसंपदेमुळे हे अशा माशांच्या वास्तव्याचे ठिकाण असून प्रजनन केंद्र असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात वैविध्यता असलेली मत्स्य प्रजाती आढळत आहे.
