मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे रविवारी सकाळी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. निधनासमयी ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
हातकणंगलेकर यांच्यावर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निधन झाले. दुपारी सांगलीच्या कृष्णाकाठी असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले.
 हातकणंगलेकर यांनी सांगलीच्या विलग्डन महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापक म्हणून काम केले होते. इंग्रजी वाचनाबरोबरच त्यांनी मराठी वाचनाचा व्यासंग जोपासला होता. त्यांची साहित्यातील अधोरेखिते, मराठी साहित्य प्रेरणा आणि प्रवाह, निवडक मराठी समीक्षा, मराठी कथा लय व परिसर, साहित्य विवेक, आठवणीतील माणसे, भाषणे आणि परीक्षणे, जी. एं.ची निवडक पत्रे खंड १ ते ४, वाङ्मयीन शैली व तंत्र, ललित शिफारस आणि साहित्य सोबती आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्यातील सौंदर्यशास्त्र, समीक्षा, कथा, कविता यांची समीक्षा आदीबाबत त्यांच्या व्यासंगी लेखांचा संग्रह साहित्यातील अधोरेखिते या पुस्तकात पाहण्यास मिळतो.

म. द. यांची समीक्षा म्हणजे एक मापदंड असल्याची भावना मराठी साहित्य क्षेत्रात मानली जाते. सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला होता.
हातकणंगलेकर हे सातत्याने नव्या पुस्तकांची दखल घेणारे समीक्षक होत. नव्या पिढीचे कौतुक असलेले ते साक्षेपी व संयमी समीक्षक होते. नव्या पिढीला बरोबर घेऊन वावरणारे ते व्यक्ती होते. छंद सारख्या नियतकालिकांमधून किंवा इतरत्र त्यांनी मोजके लेखन केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक मी त्यांच्याविरुध्दच लढवली. त्यावेळी सर्वात आधी त्यांना जाऊन भेटलो व मग प्रचाराला प्रारंभ केला. आमचे अत्यंत चांगले व्यक्तिगत संबंध होते.
-वसंत आबाजी डहाके