करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोककलावंतांना दिलासा; राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल!

करोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे राज्यातील शेकडो लोककलावंत, कलाकार, लोककला पथकांचे चालक-मालक, निर्माते यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Lokkala
करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोककलावंतांना दिलासा; राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल! (संग्रहित छायाचित्र)

करोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे राज्यातील शेकडो लोककलावंत, कलाकार, लोककला पथकांचे चालक-मालक, निर्माते यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कार्यक्रम ठप्प असल्याने मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्य कोविड संसर्गाशी लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यात एक बैठक पार पडली. यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देश दिले आहेत. राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. या बैठकीदरम्यान सांस्कृतिक कार्य विभागाचे सादरीकरणही करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती.

राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास ८ हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास ४८ हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार ५ हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास २८ कोटी रुपये खर्च होणार आहे.

Zika Virus: पुणे जिल्ह्यातील बेलसर गावाची केंद्रीय आरोग्य पथकाकडून पाहणी

राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास ८४७ संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी १ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री  अमित देशमुख यांनी सांगितले.

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अदर पूनावाला यांची मोठी घोषणा; आर्थिक मदतीसाठी घेतला पुढाकार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा,सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपथित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Relief for artists who found themselves in financial crisis because of corona rmt

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!