राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सांगली, मिरजेत गुरुवारी साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी मंडप उभारून राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सांगलीमध्ये जय भीम व्यायाम मंडळाच्यावतीने जिल्हा रुग्णालयानजीक स्मृती कट्टा येथे राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष किरणराज कांबळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेश दुधगांवकर, सिद्धार्थ कांबळे, गोपाळ ढाले, चिंतामणी कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर जयंती महोत्सवाच्यावतीने बस स्थानक परिसरात शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मोहन साबळे, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्यावतीने कार्यालयात शाहू जयंती साजरी करण्याबरोबरच मराठा आरक्षण शासनाने जाहीर केल्याबद्दल साखर वाटप करण्यात आले. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, बाळ सावंत, संभाजी पोळ, किरण देसाई, जिजाऊ ब्रिगेडच्या श्रीमती आशा पाटील, ज्योती सावंत, सुप्रिया घाडगे, सुवर्णा माने, संजीवनी जाधव आदी उपस्थित होत्या.
मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराणाप्रताप चौकात शाहू राजांना अभिवादन केले. तर मिरज विकास संघाच्यावतीने मराठा समाजाला १६ व मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिल्याबद्दल साखर वाटप करण्यात आले. यावेळी जैलाब शेख, युसूफ शेख, अनिल बाबर, नारायण बेळगांवकर आदी कार्यकत्रे उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्यावतीने मिरजेच्या राजर्षी शाहू चौकात शाहू जयंती साजरी करण्यात आली.