कोल्हापूरमध्ये कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याचे कळताच ८७ वर्षांचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामभाऊ पटांगडे निषेधासाठी बाहेर पडले. भ्याड हल्ल्याचा प्रकार दुर्दैवी असून हल्लेखोरांना तातडीने पकडण्याची मागणी विडी कामगारांची संघटना बांधणाऱ्या पटांगडे यांनी केली. पटांगडे यांच्यासह डाव्या चळवळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे पानसरे’ असे फलक हाती घेत शहरातील पैठण गेटवर निषेध नोंदविला.
दलित, शोषित समाजाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आजचा नाही. महात्मा गांधी, नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करणारी प्रवृत्ती आणि पानसरे यांच्यावरील हल्ला एकाच विचारसरणीतून झाल्याची टीका या वेळी कार्यकर्त्यांनी केली. कॉ. पानसरेंवर हल्ला झाल्याचे कळताच शहरातील डाव्या चळवळीत काम करणारे कार्यकर्ते निषेधासाठी पैठण गेट भागात एकत्र जमले. या वेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राम बाहेती यांनी हा हल्ला फॅसिस्टवादी आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना सरकार पकडू शकले नाही. त्यातून त्यांची हिंमत वाढल्याने पानसरे यांच्यावर हल्ला झाला. ही हिटलरशाही प्रवृत्ती असल्याची टीका केली. सुभाष लोमटे, अविनाश डोळस, भालचंद्र कानगो यांनीही हल्ल्याचा निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे विचार संपत नसतो. असे असेल तर आम्ही सर्व पानसरे आहोत, आम्हालाही गोळय़ा घाला, असे कार्यकर्ते म्हणत होते. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे खचून न जाता लढू, असा निर्धार या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader