शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘संभाजीनगर’चा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच ‘खैरे व्हा बहिरे…’ औरंगाबादचा झाला कायम खसरा. भाजपाचं सरकार येत नाही तोपर्यंत ‘संभाजीनगर’ विसरा’ अशी टोलेबाजीही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून केली होती. त्यानंतर आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचे नामांतर हा आमच्या सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही असे म्हटल्याने पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद येथे माध्यमांनी सध्या सुरु असलेल्या औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या वादावार प्रश्न विचारला. यावर बोलताना राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा विषय आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. शिवसेना पक्षाने आपले मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये एक पक्ष लवकरच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करणार असल्याचे म्हटले होते.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“संभाजीनगर नामांतर करायची गरज काय ? आहेच तेे संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे. ओवेसी येऊन गेला. तिथे औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवलं. यांच्या ए टीम बी टीम पाठवल्या जात आहे. कुणाच्या हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा देणार आणि हे मजा बघत बसणार आहे. आम्ही मग काय टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेण्यासाठी बसलो आहोत का?,”  असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला होता.

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बीकेसी मैदानावर सभेत बोलताना,’ आम्ही औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. त्यामुळे नामांतराची गरज काय असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना म्हणाले की, पुन्हा सोनिया गांधींची भाषा,म्हणून मला असे वाटते ‘ओ खैरे व्हा आता भैरे, औरंगाबादचा कायमचा झाला कसरा आणि भाजपाचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.